'आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार' : संजय राऊत

Aug 13, 2024 - 11:53
 0
'आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार' : संजय राऊत

बुलढाणा : यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे वक्तव्य आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केले होते.

आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली असून आमची सत्ता आली तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे वाढवू, असे वक्तव्य केले आहे.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धरले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे.

आमची सत्ता आली तर योजनेचे पैसे वाढवू

संजय राऊत म्हणाले की, रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा पराभूत झाल्या आहेत आणि ते असे बोलतात. सगळे नेते असेच त्यांच्या सारखे बोलताय. पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहे का? यांची मानसिकता सरकारी पैशाने वोट विकत घ्यायची आहे. मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू, असे त्यांनी म्हटले आहे. तर, अजित पवार हे स्वतः बारामतीत पराभूत होतील. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी तर नगरसेवकांची किंमत 5 कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये देता का? तेही मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात, असा खरपूस समाचार संजय राऊत यांनी घेतला महायुती सरकारचा घेतला आहे.

राज्यात ठाकरे-2 सरकार येणार

विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये न होता नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील 14 महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत, ते निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. लोकसभा निवडणूक घेतली कारण जगात नाचक्की झाली असती. तारीख मॅनेज करायला ते नक्कीच प्रयत्न करतील. मात्र, त्यांना निवडणूक वेळेवरच घ्यावा लागतील. निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे. खोके सरकार आम्हाला घालवायचे आहे. महायुतीला लोकसभेचा सर्व्हे अनुकूल नव्हता आता देखील नाही. आम्हाला सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-2 सरकार येणार आहे. म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. हे कोणीही थांबवू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow