संगमेश्वर : फुणगूस प्राथमिक आरोग्यकेंद्राची इमारत धोकादायक

Aug 13, 2024 - 12:09
 0
संगमेश्वर : फुणगूस प्राथमिक आरोग्यकेंद्राची इमारत धोकादायक

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस प्राथमिक आरोग्यकेंद्राची इमारत धोकादायक बनली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या इमारतीची पाहणी केल्यानंतर तेथील डॉक्टरांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. इमारत धोकादायक असल्याची माहिती सुभाष लांजेकर यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर पुढील हालचाली आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

फुणगूस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीच त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला; परंतु ते कामही गेले काही महिने रखडले होते. अत्यंत संथगतीने ते काम सुरू होते. 

आरोग्यकेंद्राचे कामकाज कर्मचारी निवासस्थान तसेच तात्पुरत्या शेडमधून सुरू ठेवण्यात आले; मात्र त्या ठिकाणी रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्यकेंद्रातील डॉक्टर राहत असलेली इमारतही अतिधोकादायक बनली असून ती कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती आहे. या संदर्भात फुणगूस येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. पालकमंत्री सामंत फुणगूस येथे आले असता लांजेकर यांनी त्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. तसेच लेखी निवेदन दिले होते. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली.

पालकमंत्री सामंत यांनी आरोग्य प्रशासनाशी चर्चा करून तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व डॉक्टर निवासस्थान धोकादायक असून ते वापरणे योग्य नाही, असे निदर्शनास येताच त्यांनी या धोकादायक इमारतीचा वापर तत्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या तसेच तिथे राहणाऱ्या डॉक्टरांना स्थलांतरित होण्याचे लेखी आदेशही दिले. त्या डॉक्टांराची पर्यायी निवास व्यवस्था केली नसल्यामुळे जुनी इमारत सोडली तर त्यांनी कोठे जायचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

वेळेत काम पूर्ण होणे अपेक्षित
फुणगूस आरोग्यकेंद्राच्या नवीन इमारतीचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निवासव्यवस्थेचा प्रश्नच उद्भवला नसता. कामात झालेली दिरंगाई सध्या उद्भवलेल्या समस्येला कारणीभूत आहे. त्यामुळे आता डॉक्टरांची व्यवस्था कुठे करायची हा प्रश्न आहे. याकडे तरी प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल, असे लांजेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow