चिपळूणात पहिल्याच दिवशी ३०० मि.मी. पाऊस

Jun 8, 2024 - 11:48
Jun 8, 2024 - 11:49
 0
चिपळूणात पहिल्याच दिवशी ३०० मि.मी. पाऊस

चिपळूण : मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून, चिपळुणात गुरुवारी (दि. ६) दुपारनंतर मान्सून अर्थात पावसाने जोरदार धडक देत मान्सूनच्या पहिल्याच टप्प्यातील पहिल्या दिवशी सुमारे ३०० मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे. 

सर्वाधिक पाऊस चिपळूण शहर परिसरात, तर सर्वाधिक कमी पूर्व भागातील कळकवणे व पश्चिम भागातील वहाळ येथे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारच्या पावसामुळे चिपळूण शहर परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले, तर शहर परिसरात पाणी कुठे तुंबले आहे व त्याची कारणे कोणती याची माहिती घेण्यासाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी न.प. चे अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे यांच्यासह पाहणी केली. 

चिपळूण तालुक्यात मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनने जोरदार धडक देत आगमन केले आहे. गुरुवार दि. ६ रोजी दुपारच्या सत्रानंतर हजेरी लावणाऱ्या जोरदार पावसाच्या सरीने चिपळुणात पहिल्याच टप्प्यातील पहिल्या दिवशी सुमारे ३०० मि.मी.चा पल्ला गाठला आहे. चिपळूण तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद चिपळूण शहर परिसर येथे झाली. सुमारे १०२ मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. त्यानंतर खेर्डी मंडलामध्ये ९५ मि.मी., असुर्डे ४५ मि.मी., सावर्डे ३१ मि.मी., पश्चिम विभागातील मार्गताम्हानेत १६ मि.मी., रामपूर १५ मि.मी., पूर्व विभागातील शिरगाव येथे १३ मि.मी., कळकवणे १० मि.मी., तसेच वहाळ येथे १० मि.मी. अशी एकूण ३३९ मि.मी.ची नोंद गुरूवारच्या पावसात झाली आहे. मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी खूष आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात भातशेतीचे पेरे करणाऱ्या शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनाबरोबर शेतीची पाहणी केल्यावर भातरोपांना अंकूर फुटल्याने पावसाचे सातत्य कायम राहिल्यास यंदा भातशेतीचा उतारा चांगला येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्याच पावसामुळे चिपळूण शहर परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची ठिकाणे विविध कारणांनी बुजल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. नेहमीप्रमाणेच साने गुरुजी उद्यान परिसर, वाचनालय परिसरासह बाजारपेठेतील काही भाग तसेच पेठमाप, रेल्वे पुलाखालील भाग, महामार्गावरील सखल भागात पाणी तुंबले होते. 

शहरातील नाले सफाई झाली असली तरी पुन्हा नाले व गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील बेजबाबदार नागरिकांकडून कचरा तसेच प्लॅस्टीक बाटल्या टाकण्यात आल्याने प्रामुख्याने बाजारपेठेतील गटारांमध्ये प्लॅस्टीक बाटल्या अडकून राहिल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह तुंबून परिसरातील पाणी रस्त्यावर आले होते. या सर्व ठिकाणांची पाहणी अधिकाऱ्यांनी करून पाणी तुंबून राहाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत नियोजन सूचविले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 08-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow