पवारांनी वाटोळं केलं हे जनतेला माहीत आहे, त्यामुळेच तुमच्याकडे आरक्षण मागतोय : मनोज जरांगे

Aug 13, 2024 - 14:15
 0
पवारांनी वाटोळं केलं हे जनतेला माहीत आहे, त्यामुळेच तुमच्याकडे आरक्षण मागतोय : मनोज जरांगे

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, यासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सध्या शांतता रॅलीच्या माध्यमातून राज्यव्यापी दौरा सुरू आहे.

सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळं केलं आहे, त्यामुळेच तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहेत, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे.

मराठा आरक्षणाविषयीशरद पवार यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. याबाबत प्रश्न विचारला असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "पवारांची भूमिका दुटप्पी आहे, मग तुमची भूमिका खूप सरळमार्गी आहे का? ११ महिने झाले तुम्ही म्हणाला होतात की सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करू. ४ दिवसांत गुन्हे मागे घेऊ असं तुम्ही १ वर्षांपूर्वी म्हणाला होता. जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळं केलं आहे. म्हणून तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहेत. पण तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही खालच्या विचारांचे निघाला आहात. आमचं कोणी वाटोळं केलं, हे समाजाला माहीत आहे, १६ टक्के आरक्षण कुठं गेलं, हेही समाजाला माहीत आहे. त्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून तुम्हालाही द्यायचं नाही का?" असा सवाल मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेतून विचारला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीकडून वारंवार केला जातो. मात्र याच जरांगे यांनी आता थेट शरद पवार यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राणेंवरही साधला निशाणा

माझ्यावर टीका करत असलेल्या नारायण राणे यांच्या मुलांना आपण किंमत देत नसल्याचा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मी नारायण राणेंच्या पोरांना किंमत देत नाही. इकडे त्यांना कोण विचारतं? मी निलेश साहेबांना तीन चार वेळा सांगितलं की, मी राणे कुटुंबीयांचा सन्मान करतो. तुमचं काही ना काही तरी योगदान आहे. वय मोठं आहे. त्यांना समजून सांगा. मी त्यांचा सन्मान करतो. मी त्यांना एक शब्दही उद्देशून बोललेलो नाही. मग तुम्ही बळंच मला कशाला बोलता आणि तुम्ही बोलल्यावर मी कसा काय सोडेन का? मी शब्द वापरलाच नाही., तरी तुम्ही मला बोलता. आता कारण नसताना मी बोललो तर ते मला उलट बोलणारच ना. त्यामुळे कारण नसताना तुम्ही मला आणि समाजाला बोलला तर उत्तर मिळणारच ना? त्यामुळे समाजाविरुद्ध बोलू नका," असं जरांगे यांनी म्हटलं आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow