'श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन' उपक्रमाला सुरुवात

Aug 5, 2024 - 09:59
 0
'श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन' उपक्रमाला सुरुवात

मुंबई : राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी 'श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरामध्ये तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे. तसेच या उपक्रमाचा प्रवाशांनी जास्तीत जास्त उपभोग घ्यावा, असे आवाहन महामंडळाने नागरिकांना केले आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याच अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याचे नियोजन करतात. यासाठी एसटीने 'श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.  

एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येते. तसेच त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती माफक स्वरुपात दिल्या जातात. तसेच यावेळी अमृत महोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तसेच १२ वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते. गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशाप्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मार्लेश्वर अशा तीर्थक्षेत्र बरोबरच अष्टविनायक, दर गुरुवारी नृसिंहवाडी,औदुबंर दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते. सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतो. तसेच यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत, असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहे. एसटीकडे प्रवाशांचा ओघ वाढताना कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा आणि अभिनव उपक्रमांमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडेल, अशी कामगिरी करण्याचे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow