विनेश फोगाटला 'तारीख पे तारीख'; अपात्रता प्रकरणावर आता १६ ऑगस्टला निकालाची शक्यता

Aug 14, 2024 - 10:39
 0
विनेश फोगाटला 'तारीख पे तारीख'; अपात्रता प्रकरणावर आता १६ ऑगस्टला निकालाची शक्यता

पॅरिस : कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणी अपात्रता प्रकरणावर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने पुन्हा एकदा निकाल पुढे ढकलला असून याप्रकरणी आता १६ ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री साडेनऊला निकाल येण्याची अपेक्षा होती.

पण तो पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजन गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशला १०० ग्रॅम वजन अधिक असल्याच्या कारणास्तव अपात्र घोषित करण्यात आले होते. त्या निर्णयाला विनेश मार्फत भारतीय कुस्ती महासंघाने आव्हान दिल्याची माहिती आयओएने दिली.

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसने (सीएएस) भारताची महिला मल्ल विनेश फोगाटच्या याचिकेवरील निर्णय मंगळवारी लांबणीवर टाकला. आता यावर १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी फैसला होणार आहे. विनेशच्या याचिकेवर आधी ऑलिम्पिक संपण्याआधी अर्थात ११ ऑगस्टपूर्वी निर्णय होणार होता. नंतर तो १३ ऑगस्टला होईल, असे जाहीर करण्यात आले. मंगळवारी हा निर्णय आणखी लांबणीवर गेला.

१०० ग्रॅम वजन अधिक असल्याचे कारण देत पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजन गटाची फायनल खेळण्यापासून विनेशला रोखले होते. तिच्यावर अपात्रतेची कारवाई झाली. विनेशने या विरोधात सीएएसकडे दाद मागितली आहे.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमातील एक चूक विनेशला रौप्य मिळवून देणारी ठरू शकते. तसे न झाल्यास यूडब्ल्यूडब्ल्यूच्या संपूर्ण यंत्रणेवर वर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. २९ वर्षांच्या विनेशला ७ ऑगस्ट रोजी सुवर्णपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या सारा हिल्डबॅन्डविरुद्ध खेळण्याची परवानगी नाकारली. अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.

यूडब्ल्यूडब्ल्यूने दुसऱ्या खेळाडूसाठी त्याच नियमांत बदल केल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या नियमांनुसार एखादा खेळाडू अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांकडून आधी पराभूत झाला असेल तरच तो रिपेचेजसाठी (कांस्यपदकाचा सामना) पात्र ठरू शकतो. त्यामुळे जर विनेशला अपात्र ठरवून स्पर्धेत शेवटचे स्थान दिले गेले, तर उपउपांत्यपूर्व फेरीत विनेशकडून पराभूत झालेली युई सुसाकी रिपेचेज फेरीत कशी पोहोचली आणि शेवटी कांस्य जिंकली? हा प्रश्न उपस्थित होतो.

विनेश ज्या गटातून खेळली, त्यातून जर कोणी रिपेचेज राउंडसाठी पात्र ठरत असेल तर ती तुर्कीची एव्हिन डेमिरहान असायला हवी, जिचा युस्नेलिस गुझमनने पहिल्या फेरीत पराभव केला होता. उपांत्य फेरीत विनेशकडून ५-० ने पराभूत होऊनही गुझमन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. कारण, भारतीय कुस्तीपटू अपात्र ठरली होती. त्यामुळे सीएएस निश्चितपणे यूडब्ल्यूडब्ल्यूला प्रश्न करू शकते की त्यांनी एका प्रकरणात एक आणि दुसऱ्या प्रकरणात दुसरा नियम कसा लागू केला? हाच प्रश्न विनेशला रौप्यपदक मिळवून देणारा ठरू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow