गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक

Jul 10, 2024 - 10:29
 0
गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक

मुंबई : राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद कोण सांभाळणार याचं उत्तर अखेर मिळालं असून, माजी क्रिकेटपटू आणि २००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावणारा फलंदाज गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीय याच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची आज औपचारिक घोषणा केली. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावल्यानंतर राहुल द्रविड हे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या जबादारीतून सन्मानाने मुक्त झाले होते.

टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला होता. त्यामध्ये माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव आघाडीवर असल्याचे संकेत मिळत होते. अखेरीस भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीर याच्या नावालाच बीसीसीआयकडून पसंती देण्यात आली तसेच जय शाह यांनी त्याच्या नावाची मंगळवारी औपचारिक घोषणा केली.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचं स्वागत करणं हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. आधुनिक काळामध्ये क्रिकेट वेगाने बदलत आहे. तसेच गौतम गंभीर यांनी हे जवळून पाहिलं आहे. भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी गौतम गंभीर हे योग्य व्यक्ती असल्याची मला खात्री आहे, असा विश्वास जय शाह यांनी गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा करताना व्यक्त केला.

भारत हीच माझी ओळख आहे. तसेच माझ्या देशाची सेवा करणं हा मी माझ्या जीवनातील मोठा सन्मान समजतो. भारतीय संघामध्ये एका वेगळ्या भूमिकेतून झालेलं पुनरागमन हे माझ्यासाठी सन्माननीय आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या खांद्यावर नेहमीच १४० कोटी भारतीयांची स्वप्न असतात. ही स्वप्नं पूर्ण करण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गौतम गंभीरने सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow