नदीतील भरावामुळे हातखंबा गावात पाणी भरण्याची भीती

Jun 3, 2024 - 13:33
 0
नदीतील भरावामुळे हातखंबा गावात पाणी भरण्याची भीती

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावामध्ये वेगाने काम सुरू असून, गावातील नदीवरील पुलाचे खांबही जवळपास पूर्ण होत आले आहेत. परंतु, पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही, नदीमध्ये पाणी अडवण्यासाठी टाकलेला भराव अद्याप बाजूला न केल्यामुळे मोठा पाऊस झाल्यास हातखंब्यातील नागपूर पेठेत पाणी घुसण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

हातखंबा परिसरात महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हातखंबा गावामध्येही हायस्कूल ते मंदिरापर्यंत नदीवर पूल टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पिलर टाकण्यात आले असून, त्यावर गर्डर चढवण्याचे काम अद्याप झालेले नाही. परंतु पिलर उभारताना नदीत मातीचा भराव टाकण्यात आला होता. आता पावसाळा जवळ आला तरी हा भराव ठेकेदाराने हटवलेला नाही. ठेकेदार कंपनीला हातखंब्यातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनेही सूचना केल्या होत्या. त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे तर मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास या मातीच्या बंधाऱ्यामुळे नदीत पाण्याची पातळी वाढून हातखंबातील नागपूर पेठेपर्यंत पाणी चढण्याची भीती आहे. ग्रामसभेतही याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारीही ठेकेदाराला नोटीस बजावणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ठेकेदाराने तातडीने हा भराव हटवावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 03-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow