एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला 'ब' दर्जा प्राप्त

May 27, 2024 - 15:08
 0
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला 'ब' दर्जा प्राप्त

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळाचा (नॅक) ॲक्रिडेशन 'ब' दर्जा प्राप्त झाला. नुकतीच 'नॅक'च्या त्रिसदस्यीय समितीने या महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली होती.

या समितीमध्ये टीमचे प्रमुख म्हणून बेंगलोर विद्यापीठाच्या जिओ इंफोर्मेटिक्स विभागाचे प्राध्यापक अशोक हंजगी, टीमचे समन्वयक म्हणून जादवपूर (कलकत्ता) विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक रूप कुमार बर्मन आणि टीमच्या सदस्या म्हणून कोंबा (गोवा) येथील विद्या विकास मंडळाच्या श्री दामोदर एज्युकेशन कॅम्पसच्या प्राचार्या डॉ. प्रीता मल्या सहभागी झाल्या होत्या.

दि. १७ व १८ मे या दोन दिवसांच्या भेटीत या टीमने महाविद्यालयात राबविलेल्या अभ्यासक्रम, अभ्यासक्रमपूरक, व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रमांचा (सामाजिक सहभागाचा), संशोधन, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच महिला विकास कक्ष या विभागांसह प्रशासकीय, क्रीडा, सांस्कृतिक कामकाजाचा आढावा या समितीने घेतला होता.

संस्थेला 'ब' दर्जा प्राप्त झाल्याचे समजल्यानंतर प्रतिक्रिया देताना संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये म्हणाले, ' 'नॅक'चे ॲक्रिडेशन मिळणे हे नवनिर्माण संस्था आणि महाविद्यालय यासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. यासाठी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या नॅक ॲक्रिडेशन समितीच्या समन्वयक डॉ. पूजा मोहिते, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे, एनएसएस विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे आणि त्यांची सर्व टीम यांचे संस्थेच्या वतीने विशेष अभिनंदन.'
'महाविद्यालयाला 'नॅक'चे २.४६ गुण प्राप्त झाले आणि 'B' दर्जा मिळाला. 'B+' दर्जापासून ४ दशांश कमी म्हणजे जवळपास B+ दर्जाच मानावे लागेल. तीन महिन्यांपूर्वी संस्थेच्या दोडामार्ग येथील हळबे महाविद्यालयाला 'B++' दर्जा मिळाला; मात्र ते महाविद्यालय शासनाचे १०० टक्के अनुदान आहे. त्यामुळे बहुतांश आर्थिक जबाबदारी शासनाची असल्यामुळे तो दर्जा शैक्षणिक निकषात फार विशेष महत्त्वाचा मानला गेला नाही. रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये हे विनाअनुदान महाविद्यालय असून, येथे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसोबतच बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर, बीबीआय, बीएमए, बीएस्सी हॉटेल मॅनेजमेंट असे विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकवले जात आहेस. तसेच या सर्वांच्या तितक्याच अद्ययावत लॅबरेटरीज, प्रॅक्टिकल्स, इंडस्ट्रियल ट्रेनिंगज, ओडीसी, फिल्ड व्हिजिट, १०० टक्के प्लेसमेंट, मोठ-मोठ्या कार्पोरेर्ट कंपन्या, स्टार हॉटेल्स यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू, देश-परदेशात विद्यार्थी जॉब त्यांचे प्रेझेंटेशन हा अवाढव्य कारभार ज्यावेळी येथे येणारी कमिटी अभ्यासू लागली तेव्हा त्यांचीही उत्कंठा इतकी शिगेला पोहोचली की, प्रत्येक क्षेत्रातील उच्चतम प्रेझेंटेशन आम्हाला द्या, असा आग्रह त्यांनी धरला. वर्षानुवर्ष कला, वाणिज्य, विज्ञान हे पारंपारिक अभ्यासक्रम चालविण्यापेक्षा हे आव्हानच अफाट आणि अचाट होते,' श्री. हेगशेट्ये यांनी सांगितले.

महाविद्यालयाला भेट दिलेल्या समितीमध्ये बेंगलोर, कलकत्ता आणि गोवा येथून आलेल्या प्रतिनिधींची दमछाक झालीच, पण त्याहीपेक्षा कसोटी होती एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची. दिवसरात्र मेहनतीने त्यांनी हे आव्हान लिलया पेलले. माझ्या सहकाऱ्यांचा मला आणि संस्थेला अभिमान आहे. संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने या निमित्ताने हा क्षण आनंद अधिक द्विगुणीत करणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow