चिपळूण : फिटनेस विलंब दंड आकारणीला स्थगिती; जिल्हा प्रवासी रिक्षाचालक मालक संघटनेजिल्हा प्रवासी रिक्षाचालक मालक संघटनेकडून स्वागत

Jun 3, 2024 - 14:36
Jun 3, 2024 - 14:39
 0
चिपळूण : फिटनेस विलंब दंड आकारणीला स्थगिती; जिल्हा प्रवासी रिक्षाचालक मालक संघटनेजिल्हा प्रवासी रिक्षाचालक मालक संघटनेकडून स्वागत

चिपळूण : पंधरा वर्षांतील वाहने/रिक्षाच्या फिटनेस विलंबाकरिता प्रतिदिन ५० रुपये दंडाची आकारणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. त्यानुसार असंख्य रिक्षा व्यावसायिकांना सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यभर रिक्षा व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. आक्रमक झालेल्या रिक्षा संघटनांच्या विरोधामुळे अखेर या विलंब दंड आकारणीला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रवासी रिक्षाचालक मालक संघटनेने या निर्णयाचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रवासी रिक्षाचालक मालक संघटनेने शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक देत या विषयाकडे लक्ष वेधले होते. १५ वर्षांच्या आतील रिक्षास प्रतिदिवस ५० रुपयांचा अतिरिक्त दंड वसूल करण्याचे फर्मान काढून गोरगरीब रिक्षाचालक यांची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप संघटनेने दिलेल्या निवेदनात केला होता. तसेच हा विलंब दंड तत्काळ रद्द करून रिक्षाचालक-मालक यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही संघटनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष दिलीप खेतले, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रताप भाटकर, राजापूर तालुकाध्यक्ष संतोष सातोसे, लांजा तालुकाध्यक्ष लहू कांबळी, दापोली तालुकाध्यक्ष राज चौगुले यांच्यासह प्रवीण भाटकर, संजय जोशी, प्रशांत गोरिवले, सचिन हातिसकर, विठ्ठल दाते, आप्पा सकपाळ, राम महाडिक आदींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्याकडे केली होती. मागणीची दखल न घेतल्यास आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यातही परिवहन विभागाच्या या निर्णयाविरोधात रिक्षा व्यावसायिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 03/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow