विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो

Jun 3, 2024 - 14:30
 0
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने 'अबकी बार ४०० पार' असा नारा देत आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात केली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर भाजपा आणि विरोधातील इंडिया आघाडीमध्ये अटीतटीचा सामना आहे, असं चित्र दिसत होतं.

पण सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएला ३५० ते ४०० च्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्येही मोठं यश मिळण्याची अपेक्षा भाजपाला असून, भाजपाकडून विजयानंतरच्या जल्लोषासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये भाजपाचे लाखो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून, हा रोड शो पंतप्रधानाच्या निवासस्थानापासून भाजपाच्या कार्यालयापर्यंत जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने आल्यानंतर मोठ्या विजयोत्सवाचं आयोजन केलं जाईल. तसेच विजयोत्सवासाठी भारत मंडपम, यशोभूमि आणि कर्तव्य पथ या ठिकाणांवरून भाजपा चाचपणी करत आहे. मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर हा मोठा विजयोत्सव साजरा केला जाईल. मात्र हा कार्यक्रम कुठे होईल, याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, विजयोत्सवाचा कार्यक्रम हा शपथविधीनंतर भारत मंडपम किंवा कर्तव्य पथावर आयोजित होण्याची शक्यता आहे. भारताचा सांस्कृतिक ठेवा या थीमवर हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. तसेच यामध्ये लाईट अँड साऊंड शोसुद्धा होणार आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये अनेक परदेशी सरकारांचे प्रतिनिधी सहभागी होतील. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी हा ९ जून रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ३० मे रोजी सरकारने शपथ घेतली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 03-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow