चिपळूण : 'यमुनातीरी आनंदे' पुस्तकाचे पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते प्रकाशन

Aug 17, 2024 - 11:33
Aug 17, 2024 - 15:02
 0
चिपळूण : 'यमुनातीरी आनंदे' पुस्तकाचे पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते प्रकाशन

चिपळूण : निसर्ग, ग्रामीण जीवन आणि स्त्रीचे भावविश्व यांनी समृद्ध असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांच्या कथा रोचक झाल्या आहेत. संध्या साठे-जोशींच्या 'यमुनातीरी आनंदे' या कथासंग्रहातील कथांचे हे वैशिष्ट्य आहे. माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला पुस्तक प्रकाशनाला बोलावले ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन पद्मश्री भिकूजी उपाख्य दादा इदाते यांनी केले.

चिपळूण येथील लेखिका संध्या साठे-जोशी यांच्या 'यमुनातीरी आनंदे' पुस्तकाचे प्रकाशन दादा इदाते यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. चिपळूण कोकण मराठी साहित्य परिषद आणि भावार्थ यांच्यातर्फे शनिवारी (ता. १०) लोटिस्मा वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. या वेळी कोमसाप कार्याध्यक्ष कवी राष्ट्रपाल सावंत, कार्यवाह अंजली साने, भावार्थचे विवेकजी कदम आणि लेखिका संध्या साठे-जोशी उपस्थित होते.

बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे संचालक सीए अमित ओक यांनी पुस्तक परिचय करून दिला. त्यानंतर पुस्तक कसे घडले. कथाविषय एकामागोमाग एक कथा वेगाने कशा लिहिल्या गेल्या ते लेखिका साठे-जोशी यांनी खुमासदार शैलीत उलगडली. फेसबुकच्या माध्यमातून अनेक चांगले रसिक जोडले गेले आहेत. पहिल्या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला तसाच या पुस्तकालाही मिळतो आहे, असे सांगून वाचकांचे काही अनुभव त्यांनी सांगितले. वाचकांच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी पुरस्कारासारख्याच आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले तर कोमसाप आणि वाचनालय संचालिका मनिषा दामले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकाश देशपांडे यांचे सहकार्य लाभले. प्रकाशनाला विविध संस्थांचे पदाधिकारी, रसिक वाचक आणि कोमसाप सभासद, परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. लेखिकेचे पहिले पुस्तक "लॉकडाउन "ला लोटिस्मा वाचनालयाचा कवी माधव पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow