रत्नागिरी : शासकीय रानभाज्या महोत्सवाकडे ग्राहकांची पाठ

Aug 19, 2024 - 12:20
 0
रत्नागिरी : शासकीय रानभाज्या महोत्सवाकडे ग्राहकांची पाठ

रत्नागिरी : जिल्हा कृषी विभागाने आयोजित केलेल्या शासकीय रानभाजी महोत्सवाचा कृषी विभागाकडून योग्य प्रचार व प्रसिद्धी न झाल्याने ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने ग्रामीण भागातून रानभाज्या घेऊन आलेल्या महिलांचा रोजगार बुडाला. अधिकाऱ्यांनी महोत्सवाचे फक्त सोपस्कार पूर्ण केल्याची स्थिती होती.

जिल्हा कृषी विभागामार्फत मराठा भवन येथे रानभाजी महोत्सव आयोजित केले होते. या महोत्सवाचे नियोजन ढिसाळ होते. कारण, महोत्सवाबाबत कोणताही प्रचार किंवा प्रसार करण्यात आला नव्हता. प्रसिद्धीमाध्यमांनाही याबाबत थांगपत्ता लागू दिला नाही. रानभाज्या महोत्सवाची प्रसिद्धीच न झाल्याने ग्राहकांनी याकडे पाठ केली. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिलांना बोलावण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी शाळांना निमंत्रित करण्यात आले होते.

या महोत्सवाच्या व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि प्रमुख पाहुणे होते; परंतु श्रोतेच नव्हते. फक्त काही शाळकरी मुळे आली होती; परंतु भाज्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी या महोत्सवाकडे पाठ फरवली होती. दुपारी साडेबारापर्यंत ग्रामीण भागातून आलेल्या स्टॉलधारक महिला ग्राहकांच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांच्या कोवळ्या आणि हिरव्यागार भाज्या कोमेजून गेल्या तरी कोणी ग्राहक आला नाही. त्यामुळे दिवसाची रोजंदारी बाहेर पडेल, या उद्देशाने आलेल्या ग्रामीण भागातील महिलांचा पुरता हिरमोड झाला होता. याबाबत प्रसार माध्यमांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. शासकीय राजभाज्या महोत्सवाबाबत प्रसार का केला नाही? प्रसिद्धी माध्यमातून महोत्सवाचा प्रसार झाला असता तर चांगला प्रतिसाद मिळाला असता. लायन्स क्लबने घेतलेल्या रानभाज्या महोत्सवाचा योग्य प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे दुपारी १२ ते १ पर्यंत सुमारे २३ हजाराच्या भाज्यांची विक्री झाली होती; परंतु या शासकीय महोत्सवाकडे अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे ग्राहकांनी पाठ केल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow