रत्नागिरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे कुचकामी..

Aug 27, 2024 - 10:36
 0
रत्नागिरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे कुचकामी..

रत्नागिरी : शहरावर नजर असलेल्या पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी आयत्यावेळी धोका दिला आहे. साळवी स्टॉप येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उघड झाल्याने सुरक्षा उपायांचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. देखभाल दुरुस्तीअभावी हे कॅमेरे कुचकामी ठरत आहेत. यामुळे तरुणीवर अत्याचार करणारा नराधम या कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटला असून, पोलिसांना इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याची नामुष्की आली आहे. आमदार राजन साळवी यांनी देखील याबाबत खेद व्यक्त केला.

एचडी, बुलेट आणि एएनपीआर, अशा अत्याधुनिक पद्धतीचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे रत्नागिरी शहरामध्ये बसविण्याच्या प्रकल्प राबविण्यात आला. मुंबईमधील एका कंपनीने याचा ठेका घेतला होता. शहरामध्ये ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्हा नियोजनमधून त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला होणारा अडथळा, आदी बारीकसारीक हालचालींवर पोलिसांची नजर ठेवता येणार होती. सोमवारी चंपक मैदानावर एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. ही मुलगी साळवी स्टॉपला ज्या रिक्षात बसली व पुढे कोठे गेली ते या सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन नराधमापर्यंत पोहोचणे सोपे झाले असते; परंतु साळवी स्टॉप येथील सीसीटीव्ही बंद असल्याचे उघड झाले. सीसीटीव्हीचे शहरातील जाळे कुचकामी ठरले आहे.

■  शहरात ५७ कॅमेरे तैनात

शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सावर्जनिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, काही संवेदनशील भाग, आदी ठिकाणी सुमारे ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आहेत. त्याचे नियंत्रण कक्ष पोलिस मुख्यालयात करण्यात आले आहे. त्यासाठी दोन ते तीन कर्मचारी नियुक्त केले असून, ते चोवीस तास या कॅमेऱ्यावर लक्ष ठेऊन असतात; परंतु आज हे सीसी टीव्ही कॅमेरे कुचकामी असल्याचे पितळ उघडे पडले आहे.

"प्रशासन सुस्त असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. बदलापूर येथील घटनेचा माग सीसीटीव्हीमुळेच दोन तासांत काढण्यात यश आले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. अन्यथा, आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल". - आमदार राजन साळवी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow