राज्यात पाच वर्षांत वीस हजार बालिकांवर लैंगिक अत्याचार

Aug 21, 2024 - 10:26
 0
राज्यात पाच वर्षांत वीस हजार बालिकांवर लैंगिक अत्याचार

मुंबई : बदलापूर येथे शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने नागरिकांचा उद्रेक झाला असताना, मागील पाच वर्षांत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. २०१९ ते जून २०२४ पर्यंत राज्यातील १८ वर्षांखालील २० हजार १३६ मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच पाच वर्षांच्या काळात १८ वर्षांवरील १२ हजार ८३२ महिलांवर बलात्कार झाला आहे. 'क्राईम इन इंडिया'चे २०१९ ते २०२२ पर्यंतचे अहवाल आणि २०२३ ते जून २०२४ पुणे 'सीआयडी'च्या माहितीच्या आधारे राज्याच्या गृह विभागाने ही आकडेवारी एकत्रित केली आहे

मागच्या दोन वर्षात तर प्रत्येक वर्षों चार हजारपेक्षा जास्त बालिकांवर बलात्कार झाला आहे. साधारण तेच प्रमाण चालू वर्षात देखील असून जून २०२४ पर्यंत २१४७ बालिकांवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती गृह विभागातील वरित सूत्रांनी दिली. बदलापूर येथे दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर देखील सरकार याविषयी कठोर पावले उचलणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. वेळीच कठोर पावले उचलून अशा घटनांना पायबंद घातला नाही तर मागच्या दोन वर्षांप्रमाणे यावर्षी देखील बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतील, अशी शक्यता आहे.

१८ वर्षांवरील महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमध्येही मागील पाच वर्षात वाढ झाली आहे. यावर्षी जून २०२४ पर्यंत बलात्काराच्या १, ६८८ घटना घडल्या आहेत. तर २०१९ ते जून २०२४ या काळात १२ हजार ८३२ महिलांवर बलात्कार झाला आहे. मागच्या दोन वर्षांत महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow