पराभव दिसू लागल्यामुळे भास्कर जाधवांचा भाजपविरोधात थयथयाट : नीलेश सुर्वे

Aug 21, 2024 - 11:02
Aug 21, 2024 - 11:39
 0
पराभव दिसू लागल्यामुळे भास्कर जाधवांचा भाजपविरोधात थयथयाट : नीलेश सुर्वे

गुहागर : आतापर्यंत विकासकामे करताना निधी दिला म्हणून टीका करणारे आमदार भास्कर जाधव यांना पैसा जनतेचाच असल्याची उपरती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत ते अपमान करत आहेत. त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे त्यांचा भाजपविरोधात थयथयाट सुरू झाला आहे, अशी टीका भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी केली.

शृंगारतळी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी आमदार जाधव यांनी गुढेफाटा येथे केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. या वेळी तालुका सरचिटणीस सचिन ओक, संगम मोरे, दिनेश बागकर आदी उपस्थित होते. मुंढर, पोमेंडी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी घाई करणारे हेच आमदार जाधव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी आला नाही म्हणून जनतेला उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ झाला म्हणता तर आमदार म्हणून तुम्ही काय करत होता? जलजीवन कामाच्या भूमिपूजनावेळी स्वतःचे व स्वतःच्या पुत्राचे फलक कशाला लावलात? रेशनकार्डवर मिळणाऱ्या सर्व योजना शासनाच्या निकषाप्रमाणे असतात. त्यामुळे जो पात्र आहे त्याला लाभ मिळणारच. रेशनदुकान देतो, तुम्ही आमच्या पक्षात या, असे आपला एकही कार्यकर्ता बोलत नाही. जर चुकीचे असेल तर तुम्ही कारवाई करून दाखवाच. तुमच्या पुत्राच्या जिल्हा परिषद मतदार संघात एकदा फिरून विकासाचा किती बट्ट्याबोळ झाला आहे ते पाहा. एका बाजूला निधी कमी पडू देणार नाही, असे म्हणतात तर दुसऱ्या बाजूला निधी मिळत नाही म्हणून शंखध्वनी करत आहेत. ज्या पक्षनेतृत्वाबरोबर आहात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी तुम्ही राष्ट्रवादीत असताना करत होता. आदित्य ठाकरेंना वासरू, मेंढरू म्हणून बोलत होता. थयथयाट करून जनतेच्या नजरेतून तुम्ही उत्तरत आहात. पराभव दिसू लागल्याने हा थयथयाट सुरू केला असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

आमदार जाधवांची भूमिका दुटप्पी
एमआयडीसीला स्थानिकांचा विरोध होता म्हणून ती रद्द झाली. पाच वर्षे तुम्ही मंत्री होता तेव्हा का नाही येथील उद्योग मार्गी लावलात बहीण योजनेवरही दुटप्पी भूमिका मांडतात. एका बाजूला योजनेचे समर्थन करायचे तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अधिवेशनातून आपल्या पक्षनेत्याला घाबरून पथनाट्य सादर करून टीका करायची, असा टोला सुर्वे यांनी हाणला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow