राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच

Aug 22, 2024 - 12:09
 0
राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस होता. निवासी डॉक्टर संघटनेने संप मागे घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने गुरुवारी काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

डॉक्टरांच्या या काम बंद आंदोलनामुळे नियमित रुग्णांच्या नियमित शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. ओपीडीमधील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असल्याने रुग्ण सेवेवर याचा विपरित परिणाम होत आहे.

मुंबईतील पाचही प्रमुख रुग्णालयांत बुधवारी ओपीडी सुरू होती. रुग्णालयात निवासी डॉक्टर आणि इंटर्न्स नसल्यामुळे रुग्णांच्या उपचारात बाधा येत आहेत. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आपला दवाखाना येथून २०० डॉक्टरांची कुमक मागविली होती. महापालिकेतील अध्यापक संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे महापालिकेतील रुग्णालयात बुधवारी सर्व प्राध्यापकांनी त्यांचे नियमित काम केले. अत्यावश्यक सेवेवर फारसा परिणाम जाणून आलेला नाही.

निवासी डॉक्टरांचे पगार रखडले
राज्य शासनाच्या अखत्यारीत वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांचे दोन ते तीन महिन्यांपासूनच पगार झालेले नाहीत. काही महाविद्यालयात पाच महिन्यांचे पगार झाले नाहीत. अनेक निवासी डॉक्टरांचे कुटुंब हे त्यांच्या पगारावर अवलंबून असते. मात्र, राज्यात निवासी डॉक्टरांचे इतके मोठे आंदोलन सुरू असूनही एकही निवासी डॉक्टरांचा पगार न झाल्याने निवासी डॉक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

केईएमच्या ओपीडीत २५५२ रुग्ण
आंदोलनाच्या आठव्या दिवशी के. ई एम. रुग्णालयात २५५२, सायन येथे १५२५, नायर रुग्णालयात ८८६, तर कूपर रुग्णालयात ७९४ रुग्णांना ओपीडीमध्ये उपचार देण्यात आले. शस्त्रक्रियांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

निवासी डॉक्टरांच्या ज्या काही मागण्या आम्हाला पूर्ण करणे शक्य आहेत त्या केल्या आहेत. निवासी डॉक्टरांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या आहेत. रुग्णालयातील सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना आम्ही करत आहोत. विशेष म्हणजे या सगळ्या परिस्थितीत गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे माझे त्यांना आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या कामावर परत रुजू व्हावे.
- हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग

आमची गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत बैठक आहे. या बैठकीत मागण्या मान्य केवळ करून चालणार नाही तर त्यावर ठोस कार्यवाही व्हावी अशी मागणी आहे. महिन्याला काम केल्यावर पगार मागायची वेळच का यावी हा आम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. या घडीला राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना दोन ते तीन महिन्यांचे पगार नाहीत. त्यांनी कशा पद्धतीने जगावे. आम्हाला सुद्धा रुग्णांची परिस्थिती पाहवत नाही. पण शासन जर आमच्या मागण्या पूर्ण करणार नसेल तर यापुढे आणखी आंदोलन तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही.
- डॉ. संपत सूर्यवंशी,
मार्ड, अध्यक्ष जे. जे. रुग्णालय

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow