मंडणगडमधील बंदरं विकासाच्या प्रतीक्षेत

Aug 23, 2024 - 13:16
Aug 23, 2024 - 14:23
 0
मंडणगडमधील बंदरं विकासाच्या प्रतीक्षेत

मंडणगड : कोकण किनारप‌ट्टीवरील बंदर विकासाकरिता शासन काम करीत असताना अरबी समुद्र व सावित्री नदीच्या संगमावर बसलेल्या मंडणगड तालुक्यातील बंदरांचा विकास आजही अपेक्षित आहे. कोकणातील पहिले व्यापारी बंदर असा लौकिक लाभलेले व ब्रिटिशांची वखार म्हणून इतिहासात ओळख असणारे बाणकोट याच तालुक्यातील आहे. कोणीही येथील बंदर विकासाकडे लक्षच देत नसल्याने सावित्री खादीतून होणारी जलवाहतूक व मासेमारी व्यवसाय पूर्णतः ठप्प झाले आहेत. 

पूर्वी सावित्री खाडी व अरबी समुद्रमार्गे जलवाहतूक चालत असे. पूर्वीच्या एकत्रित रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट ते बांदा असा उल्लेख नेहमी आढळतो. रत्नागिरी जिल्ह्याला २२१ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून, त्यात ११ प्रमुख बंदरे आहेत, त्यामध्ये तालुक्यातील बाणकोट बंदराचा समावेश करण्यात आला आहे. बाणकोट बरोबरच शिपोळे, वेसवी बोरखत-गोठे, उंबरशेत, म्हाप्रळ आदी बंदरे तालुक्यात आहे. वेळोवेळीच्या राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे येथील बंदर विकास झाला नाही. केंद्र सरकारचा महत्वाकांशी असलेल्या सागरमाला प्रकल्पासाठी तालुक्यात कोणतेही नियोजन अथवा प्रस्ताव नाही. पर्यायाने सागरमाला अंतर्गत सागरी प्रवासी वाहतुक व त्याद्वारे पर्यटनातून रोजगार ही संकल्पना तालुक्यात सपशेल बारगळली. गेल्या काही वर्षांत येथे जहाज बांधणी कारखाना आणून बंदर विकासाची केवळ चर्चा सुरू होती, त्यांनतर जहाजबांधणी कारखानदारीसाठी उपयुक्तता असूनही कोणतेही प्रयत्न झालेले दिसून आले नाहीत.

कोकण किनारपट्टीवरील सागरी प्रवासी वाहतूक व मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे तालुक्यातील बंदरे प्रयत्नपूर्वक विकसित करून पारंपरिक व्यवसायारोबर विकासाच्या नवीन वाटा शोधता येतील का याचा विचार होणेही गरजेचे आहे. तालुक्यातील सावित्री नदीच्या किनारपट्टीवर अनेक गावे वसली असून, येथील मच्छिमार व्यावसायिक याच खाडीवर व अरबी समुद्रात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. मागील काही वर्षापासून किनारपट्टीवर बंदर विकासाची कामे झालेली नाहीत. किनारप‌ट्टीवर बंदरलगतच्या सुखसोई, सुसज्य जेटी, प्रवासी निवारे, धूपप्रतिबंधक बंधारे, संरक्षण भिती अशा प्रकाराची विकासाची कामे अपेक्षित आहे.

खाडीचे पाणी शिरून शेती नापीक
तालुक्यात अस्तित्वात असलेल्या जेटींचे नूतनीकरण व नवीन जेटींची निर्मिती अनेक वर्ष झाली नाही. किनारी भागातील शेतीमध्ये खाडीचे पाणी शिरून शेती नापीक होत आहे, मात्र आवश्यक असलेले धूप प्रतिबंधक बंधा-यांची निर्मिती मागील अनेक वर्षे झाली नाही. राज्यकर्त्यांनी येथील बंदर विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बंदर विकाससंदर्भात असलेल्या मेरिटाईम बोर्ड व अन्य विभागांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow