ISRO च्या आपल्या आगामी मोहिमांची माहिती..

Aug 24, 2024 - 15:34
 0
ISRO च्या आपल्या आगामी मोहिमांची माहिती..

23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस. गेल्या वर्षी, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर सरकारने हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले होते.

यानिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने आपल्या आगामी मोहिमांची माहिती दिली आहे. इस्रोने सांगितल्यानुसार, 2035 पर्यंत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करेल. तसेच, पुढील वर्षी प्रक्षेपित होणाऱ्या गगनयान मोहिमेची पूर्ण तयारी झाली आहे. याशिवाय, चांद्रयान-4 मोहिमेच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. या मोहिमेद्वारे भारतीय यान चंद्राच्या मातीसह पृथ्वीवर परत येईल.

गेल्या वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. आज पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, चंद्राशी संबंधित भारताच्या मोहिमांचा अनुभव अतिशय उत्कृष्ट आहे. चांद्रयान-4 मोहिमेत आम्ही चंद्राची माती पृथ्वीवर आणू. चांद्रयान-4 आणि 5 मोहिमांचे डिझाइन पूर्ण झाले आहे. चांद्रयान-3 मोहिमेने भारताची वाढवली, पुढील दोन मोहिमा ही क्षमता आणखी वाढवतील.

2035 पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे लक्ष्य
भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याची मोहीम 2035 पर्यंत पूर्ण केली जाईल. या स्पेस स्टेशनमध्ये पाच मॉड्यूल्स असतील, पहिले मॉड्यूल 2028 मध्ये लॉन्च केले जाईल. त्याची रचना व इतर कामे पूर्ण झाली आहेत. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. भविष्यात हे अंतराळ स्थानक अंतराळवीरांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरेल, अशी माहिती इस्रो प्रमुखांनी दिली.

गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण
गगनयान मोहिमेबाबत ते म्हणाले की, सर्व काही तयार आहे. आम्ही तयार आहोत, अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. 2025 मध्ये 3 सदस्यांची एक टीम 3 दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या कक्षेपासून 400 किलोमीटर वर पाठवली जाईल. या मोहिमेचे पहिले मानवरहित प्रक्षेपण या वर्षी डिसेंबरमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे. 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची इस्रोची योजना आहे. यावर काम सुरू आहे, अशी महत्वाची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे, चंद्रावर पाऊल ठेवणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. शेजारी देश चीनदेखील 2030 पर्यंत आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याच्या दिशेने काम करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow