दापोली : पुरुषोत्तमनगरातील पुनर्वसन केलेल्या ११ घरांना भीषण पाणीटंचाईचा सामना

Jun 4, 2024 - 12:31
Jun 4, 2024 - 12:40
 0
दापोली :  पुरुषोत्तमनगरातील पुनर्वसन केलेल्या  ११ घरांना भीषण पाणीटंचाईचा सामना

हर्णे : सुकोंडी-वाघिवणे धरणात जमीन गेलेल्यांचे पुरुषोत्तमनगर नावाने धरणाच्या जवळपासच पुनर्वसन केले आहे. ज्यांची धरणात जमीन गेली आहे, त्याचे पुनर्वसन झालेल्या पुरुषोत्तमनगर पुनर्वसन वसाहतीला गेल्या दोन महिन्यांपासून पाणीच मिळत नाही. यामुळे पुरुषोत्तम नगरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

दापोली तालुक्यातील सुकोंडी- वाघिवणे धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन सुकोंडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आणि बोरथळ महसुली गावानजीक पुरुषोत्तम नगर नावाने केले आले. या पुरुषोत्तम नगरात एकूण ११ घरे आहेत. या वसाहतीच्या काही अंतरावर सुकोंडी वाधिवणे नावाचे धरण आहे. धरण बांधल्यानंतर लाखो रुपये खर्च करून सांडव्याचे काम केले. त्यानंतर पुन्हा धरणाच्या पिचिंगसाठीही खर्च करण्यात आले. मात्र, धरणातील पाण्याची गळती थांबण्याचे नाव काही घेत नाही. परिणामी धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नदी पात्रात धरणातून वाहून जाणारे पाणी आता वाहून जात नाही. त्यामुळे पुरुषोत्तम नगरला नळाद्वारे पाणी पुरवठा करणारी विहीर ही धरणातील सध्याच्या पाणी साठ्याच्यावर असल्याने विहिरीला धरणातील पाणीसाठ्याचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे.

त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पुरुषोत्तम नगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गळती आणि गाळ उपसा आवश्यक सुकोंडी वाघिवणे धरणात असलेल्या मुबलक पाणी साठ्यामुळे या धरणाखाली नव्याने केळशी गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर खोदण्यात आली आहे. याच ठिकाणी आंजर्ले, पाडले आणि सुकोंडी गावांना नळांद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या विहीरी खोदण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ईळणे, लोणवडी गावांनाही पाणी टंचाईच्यातीव्र झळा पोहोचत आहेत. त्यामुळे पुरुषोत्तम नगरसारखीच अन्य पाणी योजनांची परिस्थिती होऊ नये यासाठी गळती काढणे गरजेचे आहे. धरणातील गाळही काढला गेला पाहिजे. तरच पाणी योजनांच्या विहिरींना पाणीपुरवठा होईल.

सध्या धरणामध्ये फारसे पाणी नाही. त्यामुळे तीनचार दिवसांपासून आम्हाला पाणीच मिळत नाही. आम्ही पुरुषोत्तम नगरवासीयांनी स्वखर्चाने आमच्या विहिरीतील गाळ काढून साफ करून घेतला आहे. तरीही पाणी येतच नाही. शेखर किर्वे, रहिवासी
 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 04/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow