तब्बल 60 तासानंतर अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी खुला, घाटातून धिम्या गतीने वाहतूक सुरु

Aug 27, 2024 - 10:16
 0
तब्बल 60 तासानंतर अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी खुला, घाटातून धिम्या गतीने वाहतूक सुरु

राजापूर : शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोसळलेली दरड सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हटवण्यात बांधकाम विभागाला यश आले. तब्बल 60 तासानंतर अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अणुस्कुरा घाटात तब्बल तीन दिवस भर पावसात दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. मार्गांवरील वाहतूक सुरु होण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते. माती हटवताना मातीच्या ढीगाऱ्याखाली मोठे दगड असल्याने व दगडांचा आकार मोठा असल्याने ते तीन ते चार वेळा ब्लास्ट करून हटवण्यात आले.

सदर मार्ग बंद असल्याने मुंबईहून कोकणात अणुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक गेले तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पर्यायी मार्ग म्हणून अनेकांनी यावेळी गगनबावडा मार्ग निवडला होता.

गेल्या दोन तीन वर्षात लोकांना मुंबईहून कोकणाकडे येणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गाची माहिती मिळाल्याने अनेक लोक या मार्गाने कोकणात येतात, पुणे कोल्हापूरहून राजापूर सावंतवाडीला येण्यासाठी देखील हा मार्ग लोकांना सोईचा वाटतो. दिवसभरात पाचशे ते सहाशे वाहनाची वर्दळ या मार्गावर असते सणासुदीला तर हजारोच्या संख्येने या मार्गावर वाहतूक असते.

अशा वेळी दर पावसाळ्यात अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात, अनेक अपघातही होतात तरी सार्वजनिक बांधकाम विभाग या घाटाच्या सुरक्षितेकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसतं नाही. हे जर असंच राहिले तर एखाद दिवशी दरडीखाली मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असं मतं व्यक्त करण्यात येत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow