खेड : 'त्या' पुढाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार

Aug 27, 2024 - 10:57
Aug 27, 2024 - 12:57
 0
खेड : 'त्या' पुढाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार

खेड : कोकणातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या खेड तालुक्यातील लोटे येथे काही वर्षांपूर्वी बंद कंपनीतून झालेल्या तीस कोटी रुपयांच्या भंगार चोरी प्रकरणी नुकतीच खेड पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांची नावे असून, त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असल्याचे या प्रकरणामधे दिसत आहे, असे याबाबत पोलिसांत तक्रार देणारे वैभव आंब्रे यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, मौजे लोटे एम, आय.डी.सी. मधील प्लॉट नं. सी ४१ इंडी ड्यूट मेटॅलो केमिकल्स प्रा.लि. व प्लॉट नं. सी ४२ मिशाल झिक इंडस्ट्रीज प्रा.लि. लोटे एम. आय, डी.सी या. बंद कारखान्यातून ३० नोव्हेंबर २०१९ ते दि. १५ डिसेंबर २०१९ या कालावधी भंगार चोरी झाली होती. लोटे येथील इंडी ड्यूट मेटॅलो केमिकल्स प्रा. लि. व मिशाल झिक इंड्रस्टीज प्रा. लि. या कंपन्या किरणलाल मनिलाल मेहता यांच्या मालकिच्या आहेत. या कंपनीचे मालक हे कर्जबाजारी झाल्यामुळे ते कंपन्या बंद करून साधारण १२५ कोटीहून अधिक रकमेचे विविध बँकेचे व शासनाचे कर्ज बुडवून फरार झाले. या दोन्ही कंपन्या सन २००० पासून बंद अवस्थेत आहेत. त्यानंतर सी/४२ प्लॉटवरील कंपनीचा ताबा एस.बी.आय. बँक मालाड मुंबई याच्याकडे आहे. त्यानंतर बँकेने येथे देखरेख करण्यासाठी कंपनीचा ताबा असेट रि कंट्रक्शन कंपनी लि. दादर मुंबई यांच्याकडे सन २०१७ मध्ये दिलेला होता; परंतु कंपनीने देखील योग्य प्रकारे कंपनीच्या मालमत्तेची देखभाल केली नाही. त्यानंतर सन २०१५ ते २०२० या कालावधीत मी ग्रामपंचायत लोटे येथे ग्रा. सदस्य असताना नोव्हेंबर २०१९ मध्ये वरील दोन्ही कंपन्यातील साहित्य चोरीला जात असल्याचे लोकांकडून समजल्याने घटनास्थळी जाऊन खात्री केली. त्यावेळी कंपनीच्या इमारतीची तोडफोड करुन कंपनीतील बॉयलर, मशिनरी, अँगल, रिअॅक्टर व टैंक व इतर महत्त्वाचे साहित्य चोरीस जात असल्याचे निर्देशनास आले.

दि. ३० नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ च्या कालावधीत संशयित आरोपी मुत्राकुमार उपेंद्रनारायण सिंग, संतोष ऊर्फ डोन्या प्रभाकर महाडिक, यांनी एकमेकांच्या संगनमताने विश्वास इंटरप्रायजेस क्रेन मालक विश्वास विष्णू जोशी व जयश्री विश्वास जोशी यांचे क्रेनचे सहाय्याने भंगार विक्रीता आसीफ अब्दुल कादीर मेमन ऊर्फ कच्छी यांच्या सहकार्याने तीस कोटी रुपये किमतीचे मोठे लोखंडी चॅनल, लोखंडी टैंक, रिअॅक्टर, बॉयलर, मशिनरी, लोखंडी चिमण्या कंपनीची मशनरी, लोखंडी शेड, लोखंडी भट्टी, लोखंडी ब्लोअर लाईन्स व इतर महत्वाचे साहित्य एस.बी. आय बँक मालाड, मुंबई यांची कोणतीही परवनागी न घेता चोरी केले. याबाबत डिसेंबर २०२२ रोजी तक्रार दिल्यानंतर पोलिसाकडून मुन्ना सिंग व संतोष ऊर्फ डोन्या महाडिक यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणात संशयित म्हणून स्थानिक राजकीय पुढारी लोटे सरपंच चंद्रकांत रघुनाथ चाळके, अंकुश दत्ताराम काते, माजी उपसभापती जीवन गोविंद आंब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ऊर्फ बापू आंब्रे यांची नावे समोर आली. त्यामुळे या प्रकरणी एकूण नऊ जणांचा विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर २०२२ मध्ये तक्रार दाखल झाली होती; परंतु पोलिसांचा तपास काम सुरू असल्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यामध्ये बराच काळ गेल्याने सर्वत्र ही बाब चर्चेची बनली होती.

नुकतेच या प्रकरणी खेड न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये लोटे पंचक्रोशी येथील राजकीय चेहऱ्यांचा समावेश असल्याने हा खटला एक चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow