संविधान बदलाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jun 5, 2024 - 10:46
 0
संविधान बदलाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : आम्ही नेहमीच विकासाचे राजकारण केले, यापुढेही करणार आहोत; परंतु काहींनी संविधान बदलणार, असा अपप्रचार करून संभ्रम निर्माण केला. महायुती हा संभ्रम दूर करण्यात कमी पडली.

त्याचबरोबर उमेदवारांची नावे उशिराने जाहीर झाली, त्याचाही परिणाम झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केली.

ठाणे मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. काहींनी त्यांच्या विरोधात अपप्रचार केला. 'मोदी हटाव'चा नारा दिला. मात्र, जनतेने त्यांना तडीपार केले. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार नाही.

गेल्या दोन वर्षांत महायुतीने राज्यात केलेला विकास आणि गेल्या १० वर्षांत मोदी यांनी देशाचा केलेला विकास, यामुळेच महायुतीला हे यश प्राप्त झाले. ठाण्यातील जनतेने म्हस्के यांच्या रूपाने बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदार निवडून दिला आहे, असेही शिंदे म्हणाले.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम ठाण्यावर होते. त्यामुळे ठाण्यावर पुन्हा एकदा भगवा फडकला. सर्वसामान्य कार्यकर्ता आज खासदार झाला आहे. आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण हे ठाणेकरांनी दाखवून दिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ठाणेकरांनी दाखविलेल्या विश्वासाला म्हस्के पात्र ठरतील, असेही शिंदे म्हणाले.

कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. गेल्या १० वर्षांत केलेल्या विकासकामांमुळेच त्यांना हा विजय मिळविता आला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow