जनआक्रोश समिती मुंबई- गोवा महामार्गाची ४ सप्टेंबरपासून करणार पाहणी

Sep 3, 2024 - 12:13
 0
जनआक्रोश समिती मुंबई- गोवा महामार्गाची ४ सप्टेंबरपासून  करणार पाहणी

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ ऑगस्ट रोजी पाहणी करून ३ सप्टेंबरपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन कोकणवासींना दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीमध्ये आवश्यक सुधारणा झाली आहे का, याची खात्री करण्यासाठी मुंबई-गोवा जनआक्रोश समिती उद्या ४ सप्टेंबरपासून पळस्पे ते कासू दरम्यान दौरा करून महामार्गाची सद्यस्थिती तपासणार आहे. या महामार्गावर त्यानंतरही खड्डे निदर्शनास आल्यास यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना जाब विचारू, असे जनआक्रोश सदस्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची तब्बल १८ वर्षांहून अधिक काळ रखडपट्टी झाल्याने दरवर्षी गणेशोत्सवाला गावाला जाणाऱ्या कोकणवासींना खड्‌कुधांतून मार्गक्रमणा करावी लागत होती. याविरोधात जनआक्रोश समितीचीही स्थापन होऊन महामार्गाच्या कामांना गती देण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी २६ ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. महामार्गावर होणाऱ्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. पळस्पे येथून सुरू झालेल्या दौऱ्यात पेण, माणगावपर्यंत मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. महामार्गाचे काम करण्याचे आणि देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांनी महामार्गावरील खड्डे ३ सप्टेंबरपूर्वी भरण्याचे आदेश दिले.

३ सप्टेंबरपूर्वी महामार्गावर खड्डा नसेल, गणेशोत्सवासाठी महामार्गाचा वापर करणाऱ्या भक्तांना त्रास होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होते की नाही, याची पाहणी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती करणार आहे. महामार्गावरील खड्डे खरेच भरून झाले का, याची पाहणी करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पळस्पे फाट्यापासून सुरुवात केली जाणार आहे. कोकणकर नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. खड्डे भरून झाले नसल्याचे आढळल्यास कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले खड्डे बुजविण्याचे आश्वासन खरे ठरते का, याची पाहणी करण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केला आहे. १८ वर्षे रखडलेला महामार्ग न होण्यामागे कोण जबाबदार आहे, याचा शोध घेतला पाहिजे. कारण १८ वर्षांत तीन हजारांपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. राज्यातील इतर महामार्ग पूर्ण होऊ शकतात. कोकणचा मार्ग का रखडला? असा सवाल देखील प्रतिक्रिया देताना अजय यादव (अध्यक्ष, मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती) यांनी उपस्थित केला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow