ढोलकी, पखवाज तयार करणाऱ्या कारागिरांची लगबग

Sep 6, 2024 - 12:53
Sep 6, 2024 - 12:56
 0
ढोलकी, पखवाज तयार करणाऱ्या कारागिरांची लगबग

संगमेश्वर : गणेशोत्सवामुळे भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावागावांत दाखल होऊ लागले आहेत. गणेशोत्सवात आरती आणि भजनासाठी आवश्यक ढोलकी, पखवाज तयार करणाऱ्या कारागिरांची लगबग पाहायला मिळत आहे. तीन महिने पावसामुळे बाजारपेठेतील मंदी दूर झाली आहे. गणेशस्तवनांच्या गीतांनी बाजारपेठेत नवा जोश संचारला आहे. शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठा स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.

मुंबईहून येणाऱ्या गणेशभक्तांना सजावटीचे आकर्षक साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट, अन्य साहित्य शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठेत दाखल झाले आहे. थर्माकोलवर बंदी असल्यामुळे प्लास्टिकची फुले व कापडी पडदे, इलेक्ट्रॉनिक्स लाईट अशा विविध प्रकारच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. संगमेश्वर बाजारपेठेत खरेदीदारांची लगबग सुरू झाली आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीबाबत धामणी येथील युवा उद्योजक सिद्धेश खातू म्हणाले, ग्रामीण भागातील मुंबईस्थित गणेशभक्त गावी येण्यास सुरवात झाली आहे. पुढील दोन दिवसांत बाजारात खरेदीसाठी आणखी गर्दी होईल.

शिमगोत्सवात ढोल आणि गणेशोत्सवात मृदुंग, नाल, पखवाज आणि ढोलकी यांच्या दुरुस्तीचे आणि नवीन तयार करण्याचे व काम मोठ्या प्रमाणावर असते. गणेशोत्सवापूर्वी साधारण दोन महिने ढोलकी तयार करण्याचे काम सुरू होते. उत्सवाआधी १५ दिवस हे काम दिवस-रात्र करावे लागते. त्यासाठी चार कारागीर मेहनत घेत आहेत. मजुरी आणि ढोलकी साहित्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ढोलकीचे दरही वाढवावे लागले आहेत. रामचंद्र दोरकडे, ढोलकी कारागीर, संगमेश्वर

गणेशोत्सवात धूप आणि उदबत्तीला मोठी मागणी असते. गेले चार दिवस बाजारपेठेमधून विविध प्रकारच्या उदबत्यांचा मंद आणि धुंद करणारा सुगंध सर्वत्र पसरू लागला आहे. चोखंदळ ग्राहक दरवेळी दर्जेदार आणि उत्तम गंध असणारी उदबत्तीच खरेदी करतो. गंधाशी तडजोड न करणारे ग्राहक कधीही किमतीकडे पाहत नाहीत. ५० पासून ५०० रुपयांपर्यंतची दर्जेदार उदबत्ती पॅकेट खरेदीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. नीलेश कदम, संगमेश्वर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:21 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow