रत्नागिरी : शिव बुद्रुक येथे परकार चाळ आगीत भस्मसात

May 24, 2024 - 11:57
May 24, 2024 - 12:04
 0
रत्नागिरी : शिव बुद्रुक येथे परकार चाळ आगीत भस्मसात

खेड : तालुक्यातील शिव बुद्रुक येथील इब्राहिम परकार यांच्या मालकीची चाळ बुधवारी (दि.२२) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाली. या आगीत चाळकरी व मालक यांचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. खेड तालुक्यातील शिव बुद्रुक येथे बुधवार अग्नी तांडव पहायला मिळाले. इब्राहिम परकार यांच्या चाळीला रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. चाळीत वास्तव्य करणारे सुदेश तांबे, इसहाक मणेर, राजेंद्र कदम व प्रभाकर तांबे यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवत घरातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचा भडका उडाला आणि या चारही कुटुंबाचे घरातील बहुतांश साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. यावेळी ग्रामस्थांनी लोटे अग्निशामक दल व खेड नगर पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. दोन्ही अग्निशमन दलातील जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी रात्री १२.३० वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. ग्रामस्थांनी देखील खासगी टॅकरने पाणी मागवून अग्निशमन दलाला पाणी पुरवठा केला. पहाटे आग नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरी लाखो रुपयांची वित्त हानी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पावसाळा काही दिवसांवर आल्याने येथे वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow