ऐन गणेशोत्सवात भाज्या कडाडल्या; लसणासह कोथिंबीरीच्या दरातही 'उचल'

Sep 3, 2024 - 16:46
Sep 4, 2024 - 14:25
 0
ऐन गणेशोत्सवात भाज्या कडाडल्या; लसणासह कोथिंबीरीच्या दरातही 'उचल'

रत्नागिरी : श्रावण महिन्यात भाज्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर गणेशात्सव तोंडावर असतानाच आणखी कडाडले आहेत. कांद्ये- बटाट्यांनी पन्नाशी गाठली असताना लसूणही दरात उग्र झाली आहे. कोथिंबीरची जुडी ५० रुपयांना मिळत असून, दरवाढीमुळे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडत आहे.

श्रावणात भाज्या महागल्या होत्या. त्याचबरोबर कांदे- बटाटाच्या दरांनीही उचल घेतली होती. टोमॅटो दरात घसरण झाली असली तरी आता ते ३० रुपयांवर स्थिरावले आहेत. बटाटा १०० रुपयांना अडीच किलो तर कांदे शंभर रुपयांना दोन किलोच मिळत आहेत. वांगी ५० ते ६०, भेंडी ८०, सिमला मिरची ७५ रुपये, गाजर ७० रुपये काकडी ६० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. गवार, घेवडा, फरसबी, शेवगा शेंगांनी शंभरी ओलांडली आहे. पालेभाज्या जुडीसुद्धा २० ते २५ रुपये जुडी दराने विकण्यात येत आहे. बाजारात मटारचे दर सर्वोच्च असून २०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत.

भाज्यांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकलेले आहेत. डाळीच्या दरांबरोबरच कडधान्यांचे दरही वधारले आहेत. गृहिणींना या दरवाढीचा फटका बसत आहे. कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. सध्या ५० रुपये किलो दराने विक्री सुरू असून, पाऊस लांबल्यास कांद्याचे दर वधारण्याची शक्यता आहे.

वाढत्या महागाईने घर संसार चालविणे सोपे राहिले नाही. लाडक्या बहिणींना दिलेले अनुदान समाधानकारक असले तरी ते सुखकारक नाही. सरकारने माया जपताना वाजारभावही नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. - गौरी शिंदे, गृहिणी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:14 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow