लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावांच्या खात्यातही 'या' तारखेला पैसे जमा होणार

Sep 3, 2024 - 16:47
 0
लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावांच्या खात्यातही 'या' तारखेला पैसे जमा होणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात 1 लाख 10 हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत , अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज दिली. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून 8 हजार 170 आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, अशी माहितीही मंत्री लोढा यांनी दिली. त्यामुळे, लाडक्या भावांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होतील.

याविषयीची अधिक माहिती देताना मंत्री लोढा म्हणाले, “भविष्यातील रोजगाराची (Job) आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (Chief Minister) ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.” या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी 8 हजार 170 आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच 2 लाख 21 हजार 244 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे.

धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक युवा रुजू

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालोखाल अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 5 हजार युवा रुजू झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असे मंत्री लोढा म्हणाले.

10 लाख युवकांना प्रशिक्षण

या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत 10 लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनीदेखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow