सीबीआयकडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल

Sep 4, 2024 - 16:00
 0
सीबीआयकडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली असून सीबीआयकडून त्यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती. त्यावेळी, त्यांनी थेट अनिल देशमुख यांचे नाव घेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवल आहे, याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता, गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. तसेच,राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन केलं जातंय, असेही त्यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समर्थक असणाऱ्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याच प्रकरणांमध्ये आता अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून (CBI) गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

काय आहे प्रकरण

या सगळ्या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांची प्रतिक्रिया

देशमुख यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे, ''आज माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता -न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे,'' असे म्हणत अनिल देशमुख यांनी या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, धन्यवाद देवेंद्रजी म्हणत देवेंद्र फडणवीसांचे आभारही मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow