खेड तालुक्यातील क्रीडासंकुलाच्या देखभालीची जबाबदारी सेवाभावी संस्थेला द्यावी : प्रशांत सावंत

Jun 5, 2024 - 12:02
Jun 5, 2024 - 12:05
 0
खेड तालुक्यातील क्रीडासंकुलाच्या  देखभालीची जबाबदारी सेवाभावी संस्थेला द्यावी : प्रशांत सावंत

खेड : तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या करिता ५ डिसेंबर २०१५ रोजी खेड तालुका क्रीडा संकुल या वास्तूचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. मात्र, गेली नऊ वर्षे होऊनही खेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना या क्रीडा संकुलाचा वापर करण्याची संधीच मिळाली नाही, अशी खंत आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

खेड येथील क्रीडा संकुलाचा वापर फक्त येथील स्थानिक क्लबच्या सदस्यांना बॅटमिंटन खेळासाठी होत आहे. पावसाळी, हिवाळी, उन्हाळी क्रीडा स्पर्धांसाठी तालुक्यातील खेळाडूंना सराव करता येत नाही. बंद असणाऱ्या क्रीडा संकुलामुळे त्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी खेळाडूंमधून मागणी होत आहे. खेळाडूंसाठी लोकार्पण झालेल्या क्रीडा संकुलात कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. क्रीडासंकुल ही वास्तू शोभेसाठीच आहे. गेली अनेक वर्षे खेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व खेळाडूंना या क्रीडासंकुलाचा वापर करता यावा आणि खेळाडूंना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांनी खेड तालुका क्रीडा अधिकारी व रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी यांची रत्नागिरी क्रीडा कार्यालयात भेट घेतली. मात्र, त्याची दखल रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी घेतलेली नाही. क्रीडासंकुलाचा वापर खेळाडूंसाठी होणार नसेल तर या सोयीचा काहीच उपयोग नाही. 

खेळाडूंसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार नसतील तर लवकरच दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने खेळाडूंच्या हिताच्यादृष्टीने आंदोलन करू असा इशारा सावंत यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. कायम बंद व नादुरुस्त असलेले खेड तालुका क्रीडासंकुल हे प्रशासनाला सांभाळता येत नसेल तर दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला क्रीडासंकुलाची निगा राखण्यासाठी व देखभाल करण्यासाठी द्यावे, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow