यह डर जरुरी है, मराठ्यांची भीती निर्माण झाली हे महत्त्वाचं; लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांचं वक्तव्य

Jun 5, 2024 - 11:58
 0
यह डर जरुरी है, मराठ्यांची भीती निर्माण झाली हे महत्त्वाचं; लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांचं वक्तव्य

जालना : राज्यातील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Result 2024) मराठ्यांचा डर निर्माण झाला, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण दिले नाही तर 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करुन आम्ही त्यांचा कार्यक्रमच करु, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत कोण जिंकलं किंवा कोण हरलं याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. आम्हाला निवडणुकीच्या विजयाच्या गुलालात रस नाही तर आम्हाला आरक्षणाचा गुलालच हवा असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ते बुधवारी अंतरवाली सराटीत 'एबीपी माझा'शी बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. लोकसभा निवडणुकीत कोण निवडून आलं, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. राजकारण हा माझा किंवा माझ्या समाजाचा मार्ग नाही, हे मी आधीच बोललो होतो, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

अंतरवाली सराटीत बजरंग सोनावणेंच्या भेटीबाबत जरांगे पाटील काय म्हणाले?

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी मंगळवारी रात्री अडीच वाजता अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. याबाबत विचारणा केली असता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, अंतरवाली सराटीत मला यापूर्वीही सगळे भेटायला येत होते, आताही भेटायला येतात. त्यांना मला काही म्हणता येत नाही. कोणीही आल्यानंतर त्याला शुभेच्छा देणं, हे माझे कर्तव्य असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

बीड आणि जालन्याच्या निकालावर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्याशी शाब्दिक वाद झाला होता. याचा फटका मुंडे आणि रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत बसल्याची चर्चा आहे. याबाबत विचारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मी राजकारणात नाही. मी लोकसभा निवडणुकीत कोणाला पाडा, असे म्हटले नाही. फक्त कोणाला पाडाल किंवा निवडाल, ते अशा पद्धतीने करा की, मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. मराठा समाजाने या निवडणुकीत त्यांची भूमिका दाखवून दिले, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

सरकारने माझ्या नादी लागू नये, हे मी आजही सांगतोय. माझ्यासोबत गोडीगुलाबीने वागा. जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर विधानसभा निवडणुकीत मी 288 मतदारसंघात सगळ्या जातीधर्माचे उमेदवार उभे करुन सरकारचा कार्यक्रमच लावणार. या उमेदवारांमध्ये गोरगरीब, मुस्लीम, दलित, राजपूत, धनगर, लिंगायत आणि बारा बलुतेदार अशा सगळ्यांचा समावेश असेल. गोरगरीबांच्या हातात मी सत्ता देईन. आता मी 8 जूनपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की, तुम्ही तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्या. आम्हाला आमचा हक्क देऊन टाका. आम्ही आता आणखी वाट पाहणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow