शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा रत्नागिरी जिल्ह्यातील आशा सेविका, गटप्रवर्तकांना मिळणार लाभ

Sep 5, 2024 - 12:00
Sep 5, 2024 - 12:03
 0
शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा रत्नागिरी जिल्ह्यातील आशा सेविका, गटप्रवर्तकांना मिळणार लाभ

रत्नागिरी : आरोग्य विषयी जनजागृती, प्रोत्साहन देणे, माता व बाल आरोग्य या विविध कामांच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

सेवा बजावताना अपघाती मृत्यू आल्यास १० लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाखांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे.

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करणे अशा प्रकारची कर्तव्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना बजवावी लागतात. आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १ एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू झाला आहे. या निर्णयाने आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा मिळाला आहे.

२ हजार ९१३ आशा सेविका कार्यरत
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात २ हजार ९१३ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. तर १३६ गटप्रवर्तक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना होणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow