कायद्यांबाबत महिलांमध्येच माहितीचा अभाव : अॅड. अमित शिरगावकर

Aug 3, 2024 - 14:23
 0
कायद्यांबाबत महिलांमध्येच माहितीचा अभाव : अॅड. अमित शिरगावकर

रत्नागिरी : महिलांसाठी असलेल्या कायद्यांवर नजर टाकली तर अनेक कायदे महिलांसाठी अनुकूल आहेत: मात्र महिलांमध्येच या संदर्भात माहितीचा अभाव आढळून येतो. असे अॅड. अमित शिरगावकर यांनी सांगितले. येथील नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्यावतीने आयोजित 'महिला अत्याचार आणि कायदे' विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पांडुरंग नंदिवले, सहायक पोलिस उपनिरीक्षक टेमकर यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, महिला विकास कक्षप्रमुख प्रा. सोनिया मापुस्कर उपस्थित होत्या.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना अॅड. शिरगावकर यांनी जामीन न मिळणारे गुन्हे, कौटुंबिक गुन्हेगारी, कौटुंबिक हिंसाचार कायदा २०१५, वाहनविषयक कायदे, पोक्सो अॅक्ट २०१५ या विषयी मुद्देसूद माहिती दिली. ते म्हणाले, एखादी घटना मिटवण्यासाठी अनेक कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. समुपदेशक नंदिवले यांनी समाजमाध्यमाचा काळजीपूर्वक वापर करण्याचा सल्ला देतानाच विद्यार्थी जीवनात असतानाच आपले ध्येय निश्चित करा आणि कुणाशीही गैरवर्तन करू नका, असा सल्ला दिला. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. निकिता नलावडे यांनी केले.

अमली पदार्थ टाळा
सहायक पोलिस उपनिरीक्षक टेमकर यांनी अपघात होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक वय हे १६ ते २४ असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. अमली पदार्थ टाळा तसेच व्यसनाधीनता कमी करा, असा सल्लाही दिला. तसेच मदतीसाठी ११२ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow