रत्नागिरी : पर्यटन अणि शांतता विषयावर २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन

Sep 6, 2024 - 09:31
Sep 6, 2024 - 14:31
 0
रत्नागिरी : पर्यटन अणि शांतता विषयावर २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन

रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझमद्वारे चालू वर्षाकरिता पर्यटन आणि शांतता हे जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य असून त्याअनुषंगाने पर्यटन दिन साजरा होणार आहे.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रत्नागिरीत परिसंवाद आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिक, टूर्स ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलिअर्स, निवास न्याहारी योजनेचे चालक यांचा त्यात सहभाग असेल. सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत हा परिसंवाद होणार आहे. 

परिसंवादामध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासांच्या नव्याने छापण्यात आलेल्या माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेचे विषय असे - 1) पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, 2) पर्यटन व जागतिक शांतता, 3) महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, 4) माझ्या स्वप्नातील पर्यटन, 5) भारत व पर्यटन-शांततेचे दूत आणि प्रतीक. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यांना महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये ३ दिवस राहण्याची संधीदेखील उपलब्ध होणार आहे. चित्रकला स्पर्धेचे विषय - 1) आवडता समुद्र किनारा, 2) कोकणातील ग्रामीण पर्यटन, 3) कोकणातील पारंपरिक मासेमारी, 4) कोकणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रधान कार्यालयामार्फत प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार असून महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये ३ दिवस राहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महामंडलाच्या पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांकरिता पारंपरिक खेळांचे आयोजन, निवासानजीकच्या सुरक्षित पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेक, नेचर वॉक तसेच इतर उपक्रमांमधून मनमुराद आनंद पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow