"एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान", फडणवीसांच्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं ट्वीट

Jun 5, 2024 - 16:29
 0
"एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान", फडणवीसांच्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं ट्वीट

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 Result) भाजप आणि महायुतीला (Mahayuti) फटका बसला आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याची मी जबाबदारी घेतो. मला जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती मी केंद्रातील नेत्यांना करणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. असे असतानाच भाजपचे मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. एकीकडे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली असताना कंबोज यांच्या ट्वीटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?

मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं आहे. फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं आहे. राज्यातले मंत्री आणि ज्येष्ठ नेतेही पराभवासाठी जबाबदार आहेत. महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपनं आत्मपरिक्षण करायला हवं, असं मोहित कंबोज आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

कंबोज यांचा रोख कुणाकडे?

कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांना लोकसभा निवडणुकीतील कामगिरीला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, असे विचारले जात आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

या लोकसभा निडणुकीत महायुतीच्या जागा घटल्या. भाजपच्याही जागा कमी झाल्या आहेत. या खराब कामगिरीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. भाजपच्या या खराब कामगिरीची मी जबाबदारी स्वीकारतो. मला मंत्रिमंडळातून मुक्त करावं, अशी विनंती मी केंद्रातील शीर्षस्थ नेत्यांना करणार आहे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करण्यासाठी हा निर्णय घेण्याची मी तयारी केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

दरम्यान, फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका मांडली. मी केंद्राशी चर्चा करणार आहे. "त्यानंतरच मी निर्णय घेणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण त्यांना सरकारच्या बाहेर जाऊन काम करण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहूनच ते संघटनेत काम करू शकतात. पुढच्या काळात फडणवीस यांच्यासोबत आम्ही राज्याला, पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची गरज नाही, तशी विनंती आम्ही फडणवीस यांना केली आहे. आम्हाला आशा आहे की ते आमची विनंती मान्य करतील," असे बावनकुळे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow