मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही : अजित पवार

Sep 12, 2024 - 14:34
 0
मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही : अजित पवार

पुणे : राज्यातील नेत्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या समाजघटकाविरुद्धची वक्तव्ये खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला.

ते आळंदीतील मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, कुणीतरी एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल अतिशय वाईट बोलतो, त्या गोष्टीशी आम्ही अजिबात सहमत नाही. अशा गोष्टींना आमचा विरोध आहे. मतमतांतर असू शकतं. पण कुठल्या तरी जातीला आणि धर्माविरोधात बोलता आणि समाजाविरोधात तेढ निर्माण करता. हे शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात अजितबात खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्याविरोधात जी काही कायदेशीर कारवाई केली जाणं शक्य असेल ती केली जाईल.

दिलीप मोहितेंना मंत्री करणार

आळंदीला दिव्याची गाडी देणार, दिलीप मोहितेंना आमदार करा असं आवाहन अजित पवार यांनी केलं. ते म्हणाले की, महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारपर्यंत गाडी पोहचली आहे. आता लाल दिव्यापर्यंत गाडी पोहचवण्यासाठी साथ द्या.

आळंदीतील गैरप्रकारांवर पोलिसांनी आळा घालावा

आपण आळंदीत नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही. मागे आलो तेव्हा दोन तास दर्शन रांग थांबवावी लागली, लोक म्हणतील हा कोण लागून गेला, जे याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं. म्हणून मी आज बाहेरून दर्शन घेतलं. पण आळंदीत घडणारे प्रकार ही चिंताजनक आहे. देवांच्या आळंदीत चुकीचे धंदे चालतायेत, वेडे-वाकडे प्रकार होतात. आता मी पोलिसांना हवं ते देतोय, मात्र त्यांचं काम नाही का? दोन नंबरचे धंदे बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, योग्य तो बंदोबस्त लावावा. कायदा सर्वांना समान आहे. आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही अन् करणारही नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं.

भावनेच्या भरात निर्णय घेतला की पश्चाताप होतो

भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका असं आवाहन अजित पवारांनी केलं. अजित पवार म्हणाले की, काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचा कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या.

राहुल गांधींवर अजित पवारांची टीका

आरक्षण मला काढायचं आहे, असं राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले. म्हणजे यांनी बोलायचं अन् पावती आमच्यावर फाडायची असं म्हणत अजित पवारांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं, पण आता विधानसभेला आम्हाला आशीर्वाद द्या असं आवाहनही त्यांनी केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow