कशेडी बोगद्यातील गळती रोखण्यासाठी नव्या तंत्राचा अवलंब करणार

Sep 13, 2024 - 14:47
Sep 13, 2024 - 14:53
 0
कशेडी बोगद्यातील गळती रोखण्यासाठी नव्या तंत्राचा अवलंब करणार

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगदा ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे चर्चेत आला होता. बोगद्यातील मोठी गळती 'ग्राऊटिंग'च्या सहाय्याने थोपवण्यात आल्याने गणेशभक्तांवरील धोक्याची टांगती तलवार दूर होऊन प्रवास सुखकर होत आहे. वाहनांची रहदारी कमी होताच लहान गळती रोखण्यासाठी नव्या तंत्राचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

जुलै महिन्यात सतत आठवडाभर झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कशेडी बोगद्यात ठिकठिकाणी गळतीचे सत्र सुरू झाले होते. राष्ट्रीय महामार्ग खात्याने गळती थोपवण्यासाठी ग्राऊटिंगचा वापर केला होता. मात्र तरीही गळती थोपवण्यात अपयश आल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली होती. वाहनचालकांनाही जीव मुठीत धरून बोगद्यातून मार्गस्थ व्हावे लागत होते. ऑगस्टअखेरीस राष्ट्रीय महामार्ग खात्याने कामगारांची जादा फौज तैनात करत गळती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्यांची निर्मिती केली आहे. यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. यामुळे तळ कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून कशेडी बोगद्याला गळती लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशी आणि वाहनचालक धास्तावले आहेत.

रहदारी कमी झाल्यावर काम सुरू
सद्यस्थितीत केवळ लहान गळती सुरू असून, वाहनांची रहदारी कमी झाल्यानंतर ही गळती थोपवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या गळती रोखण्यासाठी ग्राऊटींगसह वेगळ्या तंत्राचा अवलंब करावा लागणार आहे. लहान गळती पूर्णपणे थोपवून बोगद्यातील वाहतूक सुरक्षित केली जाईल, असेही सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:15 PM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow