संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य..

May 25, 2024 - 14:53
 0
संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य..

संगमेश्वर : येथील बसस्थानकात सध्या चिखलाचे साम्राज्य पसरलेले असून, प्रवाशांना येथून चालणेही कठीण झाले आहे.

चिखलामुळे स्थानक परिसरातील दुकानात ग्राहक येत नाही. त्यामुळे व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे. बसस्थानकाबाहेर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे गटारांमधून चिखलमिश्रित पाणी बसस्थानकात पसरलेले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्या, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

संगमेश्वर बसस्थानकाबाहेर असलेले गटार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सोनवी नदीवरील पुलाच्या कामादरम्यान तोडण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे सर्व चिखलमिश्रित पाणी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये पसरले आहे. सद्यःस्थितीत प्रवाशांना बसस्थानकात येणेही कठीण झाले आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा खड्डा झाल्यामुळे येथे फूटभर चिखल साचले आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच धोकादायक होर्डिंग गेली चार वर्षे वाकलेल्या स्थितीत आहे. त्या होर्डिंगचा जाहिरातीसाठी वापरही होत नाही. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे. तो हटवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. बसस्थानकातील अपुऱ्या जागेमुळे सध्या व्यावसायिक त्रस्त झालेले आहेत. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे गर्दीच्या हंगामात वयोवृद्ध प्रवासी नाइलाजाने बसस्थानकात खाली बसतात. गेले आठवडाभर संगमेश्वर तालुक्यात पाऊस कोसळला. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी तातडीने पत्र्याची शेड उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बसस्थानकाची जागा अपुरी असताना अनेक खासगी वाहने संगमेश्वर बसस्थानकात आणून उभी केली जात आहेत. परिवहन महामंडळासह संगमेश्वर पोलिसांनी त्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

देवरूख मार्गावर जाणाऱ्या बसस्थानकाच्या पलीकडील बाजूला लावल्या जातात; मात्र तेथे जाणारा मार्ग चिंचोळा आणि पावसाच्या पाण्याने भरलेला असल्यामुळे प्रवाशांना तिथून ये-जा करणे अशक्य आहे. या मार्गावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात सध्या चिरे टाकून ठेवले आहेत. या मार्गावरून केवळ एकच माणूस ये-जा करू शकतो. याबाबत योग्य ती उपाययोजना करून प्रवाशांचा जीव धोक्यात टाकू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्गावर सोनवी पुलाचे काम करताना संगमेश्वर बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात दोन भलेमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत; मात्र तेथे आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर आणि स्थानकात सर्वत्र चिखल पसरला असल्याचे बसस्थानकातील व्यावसायिकांचे मत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करावे लागेल, असे व्यावसायिकांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 25-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow