कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

Jun 12, 2024 - 12:05
 0
कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

सातारा : जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगर येथे ७१ तर नवजाला सर्वाधिक ९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात लवकरच पाण्याची आवक सुरू होऊ शकते.

धरणात सध्या १५ टीएमसीवर पाणी आहे. तर पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस पडत आहे. यामुळे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही शेकडो गावांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा ही विषय होता. त्यामुळे अनेक गावांतून चारा डेपो, छावण्यांची मागणी होत होती. पण, ज्याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे तो मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. ६ जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. पूर्व आणि पश्चिम भागातही धुवाधार पाऊस पडत आहे.

कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा भागात दररोजच पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच यामुळे भात लागणीलाही सुरूवात होणार आहे. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात वातावरण पावसाळी झाले. तसेच अनेक गावांतील ओढे वाहू लागले आहेत. बंधाऱ्यात पाणीसाठा झाला आहे.

सोमवारीही माण तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेत जमिनीत पाणी साचून राहिले. परिणामी पेरणीसाठी वाफसा येण्याची वेळ शेतकऱ्यांना बघावी लागणार आहे. सातारा शहरातही ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच अधूनमधून पावसाची हजेरी लागत आहे. परळी खोऱ्यात ही पावसाची चांगली हजेरी लागली आहे.

गतवर्षी कोयनेत १२ टीएमसीवर साठा..

मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सर्वत्रच पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ९५ मिलीमीटर झाला आहे. तर महाबळेश्वर येथे २८ आणि कोयनानगरला ७१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर एक जूनपासून जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला १९७ मिलीमीटर झाली. तर कोयना येथे १६६ मिलीमीटर पाऊस झालेला आहे.

महाबळेश्वरचा पाऊस ९६ मिलीमीटर पर्यंत पोहोचला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस लवकर सुरू झाला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पश्चिम भागातील प्रमुख धरणांत लवकरच पाणी आवकही सुरू होण्यास मदत होणार आहे. तर गेल्यावर्षी कोयना धरणात ११ जून रोजी १२.४७ टीएमसी पाणीसाठा होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow