विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता, सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र

Jul 3, 2024 - 14:58
 0
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता, सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र

मुंबई : विधानपरिषदेत (Vidhan Parishad) शिवीगाळप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांचं निलंबन करण्यात आलं. विधान परिषदेतील शिवीगाळीबाबत अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यामातून दिलगिरी व्यक्त केली आहे.

या पत्रानंतर अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता सभागृहात दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय जाहीर करणार आहे. दरम्यान माझा आवाज दाबणं म्हणजे जनतेचा आवाज दाबणं आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीये.

काय म्हणाले अंबादास दानवे आपल्या पत्रात?

मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु दिनांक 1 जुलै,2024 रोजी माझ्याकडून अनावधनाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही.

सभागृहाचे कामकाज सुरु आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता- भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणींचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होवू नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती.

काय म्हणले होते अंबादास दानवे?

बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो. सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधान परिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही, माझा शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. हिंदुत्व साठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत, असंही दानवे यावेळी बोलताना म्हणाले.

अंबादास दानवे यांच्यावर सूडाने कारवाई : उद्धव ठाकरे

अंबादास दानवे यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन झाले. पण त्यावर चर्चा व्हायला हवी होती. त्यावर एकतर्फी निर्णय झाला. एका कुणाकडून तरी निर्णय झाला आणि तसा निर्णय झाला. अंबादास दानवेंना माफीची संधी द्यायला हवी होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow