मंडणगड : विश्वासू ड्रायव्हरनेच कात कंपनीवर डल्ला मारला; २ लाखांच्या मुद्देमालासह फरार

मंडणगड (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शेनाळे बर्गेवाडी येथे एका बंद कात कंपनीत घरफोडी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ज्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवून कंपनी सोपवली, त्यानेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कंपनीतील सुमारे १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

आजारपणाचा घेतला फायदा

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती विजय काते (वय ४७ वर्षे) आणि त्यांची मुलगी यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना टायफॉइड झाल्याने उपचारासाठी त्या २४ जानेवारी २०२६ रोजी मुंबईला गेल्या होत्या. घर आणि कंपनी बंद असल्याचे पाहून, त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या सोनाजी लोकरे याने चोरीचा कट रचला. १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या कालावधीत ही चोरी करण्यात आली.

ड्रायव्हरसह कराडचे तिघे आरोपी

या प्रकरणी पोलिसांनी कराड (जि. सातारा) येथील तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे: १) सोनाजी रमेश लोकरे (उर्फ गणेश) – रा. कुठारे, ता. कराड (फिर्यादीचा ड्रायव्हर) २) अनिकेत राजेश मोरे – रा. कराड ३) अक्षय जगन्नाथ कचरे – रा. कराड

आरोपींनी लबाडीच्या इराद्याने आणि स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीचे कुलूप तोडून आतील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.

Kohinoor furni.1

चोरीला गेलेला मुद्देमाल (एकूण किंमत: १,९२,५००/- रुपये)

चोरट्यांनी कंपनीतून खालील वस्तू लंपास केल्या आहेत:

  • तांब्याची वायर (अंदाजे ९०० मीटर): ९०,०००/- रुपये
  • सायलेंट जनरेटर: २६,०००/- रुपये
  • ऑटो वॉल (नवीन व जुने मिळून १० नग): ४०,०००/- रुपये
  • पेट्रोल मशीन (४ नग): २०,०००/- रुपये
  • ॲल्युमिनियम शीट: १०,०००/- रुपये
  • इतर यंत्रसामग्री: इलेक्ट्रिक मशीन, ड्रिल मशीन आणि प्रेशर मीटर.

पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबईवरून परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच स्वाती काते यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:०२ वाजता या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०६, ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.