चिपळूणमध्ये जमिनीच्या वादातून ६७ वर्षीय रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण: चिपळूण शहरातील यशोधन नगर परिसरामध्ये जमिनीच्या जुन्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्ध रिक्षाचालकाला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून, पीडित वृद्ध रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नक्की काय घडले?

फिर्यादी गजानन विठोबा किंजळकर (वय ६७, रा. गोपाळकृष्ण वाडी, पाग) आणि आरोपी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जमीन-जागेवरून वाद सुरू आहेत. दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास, हॉटेल काशिराम रेस्ट हाऊस शेजारी आरोपी कोणतीही पूर्वकल्पना न देता वादग्रस्त जमिनीची मोजणी करत होते.

याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या गजानन किंजळकर यांना आरोपींनी घेराव घातला. यावेळी किसन भुवड याने फिर्यादीला शिवीगाळ करत हाताच्या ठोशाने आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली.

आरोपींचा क्रूरपणा आणि दमदाटी

केवळ मारहाण करून न थांबता, इतर आरोपींनी – संजय उर्फ बंड्या किसन भुवड, वैभव किसन भुवड आणि विश्वास भुवड (सर्व रा. पागनाका, गोपाळकृष्णवाडी, चिपळूण) – संगनमताने फिर्यादीला जमिनीवर पाडले. त्यांना लाथाबुक्क्यांनी पोटावर, पाठीवर आणि पायावर अमानवीय मारहाण करण्यात आली. मारहाण करताना आरोपींनी “हा एकटाच भेटला आहे, याला सोडू नका, ठार मारा” अशी धमकी देऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

Tata safari

पोलिसांनी केली कारवाई

या गंभीर घटनेची दखल घेत चिपळूण पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. पीडित गजानन किंजळकर यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर १०९/२०२६ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 25-04-2026