दर रविवारी सकाळी ६ ते ८ वेळेत होणार उपक्रम; शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ‘निरामय योग केंद्रा’चा पुढाकार
Ratnagiri Free Yoga Class: (रत्नागिरी) आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी रत्नागिरीजवळच्या नयनरम्य भाट्ये किनाऱ्यावर ‘निरामय योग केंद्रा’च्या वतीने मोफत योगसाधना वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला असून, दर रविवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत निसर्गाच्या सान्निध्यात नागरिकांना योगसाधना करता येणार आहे.
योगामुळे लाभणार शारीरिक व मानसिक स्वास्थ्य
योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता, स्फूर्ती आणि मानसिक शांतता वाढण्यासोबतच एकाग्रता व सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मोठी मदत होते. समाजातील प्रत्येक घटकाने निरोगी जीवनशैलीसाठी योगाचा अंगीकार करावा, या मुख्य उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सर्व वयोगटांतील नागरिक, महिला व तरुण या योगसाधना वर्गात पूर्णपणे विनामूल्य (मोफत) सहभागी होऊ शकतात.

नागरिकांना मोफत सहभागी होण्याचे आवाहन
भाट्ये किनाऱ्यावरील या मोफत योगसाधना वर्गाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ९०२८८९९४१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नम्र आवाहन योगगुरू वीरू स्वामी यांनी रत्नागिरीतील नागरिकांना केले आहे.













