रत्नागिरी : दामले विद्यालयाचे तब्बल ८ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत गुणवत्ता यादीत

◼️ सातत्यपूर्ण अध्ययन हाच यशाचा मार्ग : योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचे प्रतिपादन

रत्नागिरी, दि . २५ : सातत्यपूर्ण अध्ययन हाच यशाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आज दामले विद्यालयात केले. एनएमएमएस परीक्षा २०२६ मध्ये दामले विद्यालयाचे तब्बल ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यानिमित्त शाळेत स्वतः उपस्थित राहत त्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा गौरव केला. यावेळी मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे उपस्थित होते.

या वर्षी ८ वी इयत्तेसाठीच्या या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत आसावरी सौरभ आवताडे खुला प्रवर्गामधून ६ वी, आराध्य देवेंद्र डेंगळे खुला प्रवर्ग १८ वा, श्रेया सचिन खंदारे खुला प्रवर्ग २१ वी, दिव्या उमेश परांडे खुला प्रवर्ग २२ वी, ओम हरिश्चंद्र वरेकर खुला प्रवर्ग २५ वा, मनस्वी मंगेश कोकरे २१ वी, यश गणपत झोरे खुला प्रवर्ग ३३ वा, तर दिशा अभिजित कोलगे इतर मागास प्रवर्गातून २१ वी आली आहे.

या विद्यार्थ्यांना सौ. सिद्धी लक्ष्मण विचारे, श्री. रविंद्र नारायण शिंदे, श्री. अक्षय गणेश जोगळेकर, सौ. ज्योती उत्तम डंबाळे यांनी मार्गदर्शन केले.

दामले विद्यालयाने मिळवलेले हे यश म्हणजे गुणवत्ता यादीत येण्याच्या शाळेच्या परंपरेला साजेसे आहे. एन एम एम एस सारख्या अतिशय दर्जेदार स्पर्धा परीक्षेतील हे यश दामले विद्यालयाच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे, असेही शिक्षणाधिकारी म्हणाले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशासन अधिकारी श्री. सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मिलिंद संसारे, मुख्याध्यापक श्री . भगवान मोटे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 25-04-2026