रत्नागिरी: ‘माझ्या ड्रायव्हरला धमकी का दिली?’ म्हणत आंबा व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; सापुचेतळे येथील घटना

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथील एका आंबा व्यापाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादाचे नेमके कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश बाबू भोजे (वय ४९, रा. चांदोर, दोनआंबावाडी) हे आंबा व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत. २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रतिक खरात (वय २२, रा. खानावली, सध्या रा. सापुचेतळे) याने भोजे यांना फोन केला. “तू माझ्या गाडीच्या ड्रायव्हरला धमकी का दिलीस?” असा जाब त्याने विचारला. त्यावर भोजे यांनी “मी कोणतीही धमकी दिलेली नाही,” असे स्पष्ट केले. मात्र, आरोपीने फोनवर शिवीगाळ करत त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.

भररस्त्यात गाडी अडवून हल्ला

आरोपीला ओळखणाऱ्या व्यक्तींना भेटण्यासाठी रमेश भोजे हे आपल्या चारचाकी गाडीने लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथे गेले होते. तिथे पोहोचताच आरोपी प्रतिक खरात याने त्यांची गाडी अडवली आणि जोराने काचेवर हात मारू लागला. भोजे यांनी गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली असता, आरोपीने गाडीचा दरवाजा उघडून त्यांना ओढत बाहेर काढले.

त्यानंतर हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीवर आणि उजव्या हातावर जोराने प्रहार केले. या झटापटीत फिर्यादी भोजे यांना रस्त्यावर ढकलून देण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तुटली आणि डोळ्यावरील चष्म्याचेही नुकसान झाले आहे.

Amey jwelrs

जीवे मारण्याची धमकी

केवळ मारहाण करून न थांबता, “तुला जिवंत मारून टाकीन, कापून टाकीन,” अशी गंभीर धमकीही आरोपीने फिर्यादीला दिली. या हल्ल्यात रमेश भोजे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

पोलीस कारवाई आणि गुन्ह्याची नोंद

या घटनेनंतर रमेश भोजे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार धाव घेतली. पोलिसांनी २६ एप्रिल रोजी पहाटे १:१० वाजता आरोपी प्रतिक खरात याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(३) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.