रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी परिसरात शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली. येथील एका लाकडाच्या माचाखाली असलेल्या जाळीत बिबट्याची मादी अडकली होती. वनविभागाने अत्यंत तत्परतेने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवत या बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले असून, सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिरजोळे येथील लक्ष्मीकांत वाडीतील कोलगे किराणा दुकानाजवळ ग्रामस्थांना लाकडाच्या माचाखाली काहीतरी अडकल्याची शंका आली. जवळ जाऊन पाहिले असता तिथे एक बिबट्या जाळीत अडकल्याचे निदर्शनास आले. सकाळी ८:३० च्या सुमारास श्री. सागर शिवाजी कळंबटे आणि माजी सरपंच श्री. गजानन गुरव यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वनपाल (पाली) यांना याची माहिती दिली.
गर्दीचे नियंत्रण आणि यशस्वी रेस्क्यू
बिबट्या अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले आणि त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने बिबट्याला जाळीतून मुक्त करून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
६ ते ८ महिन्यांची मादी; आईचा शोध सुरू
वैद्यकीय तपासणीत हा बिबट्या मादी जातीचा असून तिचे वय अंदाजे ६ ते ८ महिने असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे आणि डॉ. रानभरे यांनी या बछड्याची आरोग्य तपासणी केली. सध्या हा बछडा वनविभागाच्या देखरेखीखाली असून त्याला योग्य आहार आणि औषधोपचार दिले जात आहेत. हे पिल्लू लहान असल्याने वनविभाग आता त्याच्या मातेचा (नैसर्गिक अधिवासाचा) शोध घेत आहे, जेणेकरून त्याला पुन्हा निसर्गात सोडता येईल.
या टीमने बजावली कामगिरी
या यशस्वी मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, एन. एस. गावडे, मिलिंद डाफळे, विराज संसारे, शर्वरी कदम, प्राजक्ता चव्हाण, धनंजय यादव, चालक महेश धोत्रे तसेच प्राणीमित्र ईशान खानोलकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
नागरिकांना आवाहन: “वन्यप्राणी लोकवस्तीत किंवा अडचणीत आढळल्यास नागरिकांनी स्वतः कोणताही धोका पत्करू नये. अशा वेळी तातडीने वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा,” असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
- ठिकाण: लक्ष्मीकांत वाडी, मिरजोळे (रत्नागिरी)
- वय: ६ ते ८ महिने (बिबट्या मादी)
- मदत: वनविभागाचा हेल्पलाईन क्रमांक १९२६.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:23 02-05-2026














