महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेला मोठा हादरा; रत्नागिरी, सातारा, सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेला मोठा हादरा; रत्नागिरी, सातारा, सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

एकाच वेळी धमकीचे ई-मेल्स धडकताच राज्यभरात खळबळ; कोर्ट इमारती तातडीने केल्या रिकाम्या, बीडमध्ये पक्षकार व वकिलांची धावाधाव

रत्नागिरी / मुंबई : राज्यातील न्यायव्यवस्थेला हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना सोमवारी समोर आली आहे. रत्नागिरीसह ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, हिंगोली, परभणी आणि अमरावती यांसारख्या राज्यातील अनेक जिल्हा व सत्र न्यायालयांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याचे धमकीचे ई-मेल्स प्राप्त झाले आहेत. या धमकीच्या सत्राने संपूर्ण राज्यभरातील न्यायालय परिसरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली आहे.

वरिष्ठ न्यायाधीशांच्या तत्काळ सूचना; इमारती केल्या रिकाम्या :

जिल्हा न्यायालयांच्या अधिकृत ई-मेलवर ही धमकी आल्याचे निदर्शनास येताच वरिष्ठ न्यायाधीशांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयात सुरू असलेले कामकाज तात्काळ थांबवून न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून संपूर्ण इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले.

Arihant 2

बीड, सोलापूर, साताऱ्यात तणावाचे वातावरण व गोंधळ :

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच विविध जिल्ह्यांत न्यायालयाबाहेर पडण्यासाठी मोठी गर्दी आणि गोंधळ उडाला.

बीड : बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांना बॉम्बचा ई-मेल मिळताच वकिलांसह पक्षकारांची कोर्टाबाहेर पडण्यासाठी मोठी धावाधाव झाली. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सातारा : सातारा जिल्हा न्यायालयात इमारत उडवून देण्याची धमकी येताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण परिसराचा ताबा घेऊन प्रवेश बंद केला.

सोलापूर : सोलापूर जिल्हा न्यायालयात ई-मेल येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत संपूर्ण न्यायालय परिसर निर्मनुष्य केला.

रत्नागिरीतही तातडीने हालचाली; श्वान पथकासह झाडाझडती :

रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयातही असाच धमकीचा ई-मेल आल्याचे स्पष्ट होताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. न्यायालय परिसरातील हालचालींवर तातडीने नियंत्रणे आणण्यात आली असून श्वान पथक आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या मदतीने कानाकोपऱ्याची कसून तपासणी सुरू करण्यात आली.

BDDS आणि सायबर सेल ॲक्शन मोडवर; ई-मेलचा माग काढणे सुरू :

या गंभीर घटनेची दखल घेत स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDDS) आणि सायबर सेल संयुक्तपणे कामाला लागले आहेत. न्यायालय इमारतींची कसून झाडाझडती घेतली जात असून मेटल डिटेक्टर्स आणि श्वान पथकांच्या साहाय्याने परिसर पिंजून काढला जात आहे. दरम्यान, हे धमकीचे ई-मेल्स नेमके कुठून, कोणाच्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आले आहेत, याचा तांत्रिक तपास सायबर सेलकडून युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण राज्यातील न्यायालय परिसरांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.