Plastic Currency Notes: देशात आता १० आणि २० रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा चलनात येणार; केंद्र सरकारची मंजुरी

चाचणीसाठी आरबीआय छापणार १००-१०० कोटींच्या पॉलिमर नोटा; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्यसभेत माहिती


नवी दिल्ली:
भारतीय चलनाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, आता १० आणि २० रुपयांच्या प्लॅस्टिक (पॉलिमर) नोटा लवकरच चलनात येणार आहेत. भारतीय चलनव्यवस्थेत प्रथमच असा प्रयोग केला जात असून, १० रुपये आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १०० कोटी नोटांच्या छपाईच्या चाचणीला (ट्रायल) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार ही चाचणी यशस्वी झाल्यास या नोटांचे नियमित वितरण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. मात्र, या प्लॅस्टिकच्या नोटा प्रत्यक्ष बाजारात कधी दाखल होणार, याची निश्चित तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.

२०० कोटी नोटांची चाचणी अन् एकत्रित मूल्य ३,००० कोटी रुपये
रिझर्व्ह बँकेच्या या चाचणीअंतर्गत १० रुपयांच्या १०० कोटी आणि २० रुपयांच्या १०० कोटी अशा एकूण २०० कोटी पॉलिमर नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. या नोटांचे एकत्रित दर्शनी मूल्य (Face Value) ३,००० कोटी रुपये असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, पॉलिमर नोटा बाजारात आल्यानंतर सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. १० आणि २० रुपयांच्या कागदी नोटांसोबतच या नव्या पॉलिमर नोटाही नियमितपणे व्यवहारात सुरू राहतील. रिझर्व्ह बँकेने केंद्रीय मंडळाच्या शिफारशीनुसार ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४’च्या कलम २५ अंतर्गत हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.

छपाई प्रक्रियेला वेग: BRBNMPL कडून जागतिक स्तरावर टेंडर
प्लॅस्टिक नोटांच्या छपाईच्या प्रक्रियेने आता गती घेतली आहे. आरबीआयच्या मालकीच्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड’ने (BRBNMPL) १७ जुलै रोजी पॉलिमर सबस्ट्रेटच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी जागतिक स्तरावर ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) मागवले आहे. यामध्ये बीओपीपी (BOPP) आधारित ऑपॅसिफाईड पॉलिमर सबस्ट्रेट आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसह एकूण ६८ हजार रीमची तातडीची गरज नोंदवण्यात आली आहे. प्रत्येकी ५०० शीटच्या एका रीमनुसार हा मोठा पुरवठा असणार असून, यापैकी किमान ३० टक्के (२० हजार ४०० रीम) पुरवठ्याची क्षमता असलेले बोलीदारच या प्रक्रियेत पात्र ठरणार आहेत.

कागदी नोटांच्या तुलनेत आयुष्य २ ते ६ पट अधिक; जगात ३० वर्षांपासून वापर
पॉलिमर नोटांचा प्रयोग भारतासाठी नवीन असला तरी जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून या नोटांचा वापर यशस्वीरीत्या सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने १९८८ मध्ये प्रथम पॉलिमर नोटा जारी केल्या होत्या. आज जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये प्लॅस्टिकच्या नोटा वापरल्या जात आहेत. नेहमीच्या कागदी नोटांच्या तुलनेत या पॉलिमर नोटांचे आयुष्य साधारण २ ते ६ पट अधिक असल्याचे आंतरराष्ट्रीय अनुभवावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा दैनंदिन वापरात या नोटा सहजासहजी खराब होणार नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 12-08-2026