काठमांडू/नवी दिल्ली: नेपाळमध्ये ‘जेन झेड’ (Gen Z) आंदोलनानंतर सत्तेत आलेले नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आता एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बालेन शाह यांचे हे निर्णय भारत-नेपाळ संबंधांसाठी आव्हानात्मक ठरताना दिसत आहेत. भारतासोबत ‘समान व्यवहार’ करण्याची घोषणा करणाऱ्या शाह यांच्या नव्या धोरणांचा मोठा फटका आता सीमावर्ती भागातील व्यापार आणि पर्यटनाला बसत आहे.
१०० रुपयांहून अधिकच्या वस्तूंवर ‘टॅक्स’
बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वस्तूंवर कर लावण्याची घोषणा केली होती. नव्या नियमांनुसार, १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर आता शुल्क आकारले जात आहे. नेपाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नेपाळी ग्राहक थेट भारतीय बाजारपेठेतून खरेदी करत असल्याने आपले नुकसान होत असल्याचे तेथील व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, या निर्णयामुळे सीमेवरील दोन्ही देशांचा व्यापार आता मोठ्या संकटात सापडला आहे.
वाहन चालकांसाठी क्यूआर कोड आणि ओळखपत्र अनिवार्य
नेपाळ सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार, आता भारतामधून नेपाळमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला आपले ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. याव्यतिरिक्त:
- प्रत्येक चालकाला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून वाहनाची नोंदणी करावी लागेल.
- वाहनांसाठीची ‘अस्थायी नोंदणी प्रक्रिया’ पूर्ण करणे अनिवार्य असेल.
- ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने सीमेवर वाहनांच्या रांगा लागत असून प्रवासासाठी मोठा वेळ खर्च होत आहे.
पर्यटन आणि व्यापारावर होणार परिणाम
नेपाळमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठीही आता नोंदणीचे काही जाचक नियम बनवण्यात आले आहेत. यामुळे नेपाळच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका स्थानिक व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या नियमांमुळे भारत-नेपाळमधील व्यापार पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
परराष्ट्र धोरणात भारताला झुकते माप नाही?
बालेन शाह यांनी पदभार स्वीकारताना भारत आणि चीन या दोन्ही देशांशी व्यवहार करताना कोणालाही झुकते माप दिले जाणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा सर्वाधिक परिणाम भारतावरच होताना दिसत आहे. नेपाळमधील राजकीय अस्थिरतेनंतर सत्तेत आलेल्या बालेन शाह यांच्या या भूमिकेकडे आता संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.














