रत्नागिरी : डेंग्यू हा गंभीर आजार असून मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे डेंग्यू होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन चिपळूण पालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांनी केले.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त चिपळूण तालुका आरोग्य विभाग आणि चिपळूण नगर परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. पालिकेच्या दवाखान्यापासून सुरू झालेली ही फेरी शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करून पुन्हा पालिका कार्यालयात समाप्त झाली.
या फेरीत नगर परिषदेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेवक संदीप भिसे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, नगर परिषद आरोग्य विभागाच्या डॉ. मानसी म्हापदी, जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील साळवी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, परिचारिका आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फेरीदरम्यान डेंग्यू प्रतिबंधासाठी स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे, डासांची पैदास रोखणे आणि आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे संदेश देण्यात आले. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवून आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 19-05-2026













